मंत्रिमंडळ विस्तारात अडचण नाही: फडणवीस; आता २२ जुलै नवा मुहूर्त, शिंदे गटासाठी डोकेदुखी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:02 AM2022-07-21T06:02:11+5:302022-07-21T06:02:37+5:30
पहिल्या टप्प्यात पाच मंत्री करायचे तर कोणाकोणाला संधी द्यायची, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय घडामोडींवर निकाल यायचा आहे म्हणून आमचा मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही. पुढील काही दिवसांत विस्तार नक्कीच केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने आता मंत्रिमंडळ विस्तारातही अडचणी येतील, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना फडणवीस यांनी तो फेटाळून लावला.
पहिल्या टप्प्यात ८ - ५ वाटप
पहिल्या टप्प्यात भाजपच्या ८, तर शिंदेंच्या ५ जणांचा समावेश होऊ शकतो. तथापि, एवढेच मंत्री केल्यास मोठा असंतोष समोर येऊ शकतो, म्हणून २५हून अधिक मंत्र्यांना पहिल्या टप्प्यात शपथ द्यावी असाही विचार सुरू आहे. विस्ताराचा आता २२ जुलै हा नवा मुहूर्त सांगितला जात आहे.
शिंदे गटासाठी डोकेदुखी!
पहिल्या टप्प्यात पाच मंत्री करायचे तर कोणाकोणाला संधी द्यायची, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी आहे. आधी मंत्री असलेल्या सर्वांना पहिल्या टप्प्यात न घेता आधीचे मंत्री आणि नवीन अशा दोघांनाही संधी द्यावी, असा आतापर्यंत मंत्रिपद न मिळालेल्यांचा आग्रह असल्याचे समजते. आधीच्या सरकारमधील मंत्री असलेले बरेच जण बंडानंतर काही दिवसांनी शिंदे गटात सहभागी झाले होते. आम्ही आमदारांनी मात्र राजकीय भवितव्याची चिंता न करता सुरुवातीलाच आपल्याला साथ दिली, त्यामुळे मंत्रिपदासाठी आधी आमचा विचार करा, असा आमदारांचा आग्रह असल्याची माहिती आहे.