मंत्रिमंडळ विस्तार, विशेष अधिवेशन एकाच दिवशी !
By admin | Published: July 7, 2016 01:23 AM2016-07-07T01:23:13+5:302016-07-07T01:23:13+5:30
विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती निवडण्यासाठी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन ८ जुलै रोजी होत असून त्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे जवळपास निश्चित
मुंबई : विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती निवडण्यासाठी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन ८ जुलै रोजी होत असून त्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
मंत्रिमंडळाचा विस्तार राजभवनऐवजी मंत्रालयातील नव्या इमारतील तळमजल्यावरील मोकळ्या जागेत सकाळी १० वाजता होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी या ठिकाणी विस्तार समारंभाच्या दृष्टीने पाहणी केली. विस्तार ७ किंवा ९ जुलैला होईल, असा अंदाज बांधला जात असताना आता मधलीच तारीख समोर आली आहे. अधिवेशन आणि विस्तार एकाच दिवशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली, असे समजते. विस्तारात शिवसेनेचा सहभाग असेल की नाही, याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे.
अंतिम चर्चा होऊन याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेण्यात येईल. विस्तारानंतर महामंडळांवरील नियुक्त्यांचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)