जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 01:19 PM2023-12-31T13:19:45+5:302023-12-31T13:20:10+5:30
मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय.
विधानसभा निवडणुकीला आता अवघे ८-९ महिने राहिलेले असताना शिंदे सरकारमधील तीन तिघाडीमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. बच्चू कडूंसारख्या आमदारांनी तर आता आशाच सोडून दिली आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तार का रखडला यावर शिंदे गटाच्या मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांनी मोठा दावा केला आहे.
मंत्रिपदासाठी संजय शिरसाट देखील शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून इच्छुक आहेत. परंतू, त्यानंतर विस्तार होऊनही शिरसाटांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे. दुसरा विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा तिघांना उरलेली मंत्रिपदे वाटून देण्यावरून तिढा सुटता सुटत नाहीय. त्यातच ज्यांना मिळणार नाही त्यांचीही नाराजी सोसावी लागेल, या पेचामुळे हा विस्तार रखडलेला आहे. असे असताना संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचा दावा केला आहे.
जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटलांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा ही केली होती. आजही पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
तसेच जयंत पाटलांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते तिकडेच थांबले आहेत. ते येणार होते म्हणूनच विस्तार थांबला होता, असा दावाही त्यांनी केला. संजय राऊतांवर टीका करताना शिरसाट यांनी त्यांना आता संध्याकाळी रेव्ह पार्टीला जाता येत नसेल, म्हणून ते अशी वक्तव्ये करत असतील असा टोला लगावला. तसेच राम मंदिर हा भाजपाचा कार्यक्रम नाही. सर्व पक्षाचे कारसेवक तिथे होते. सर्व देशवासियांचा राम मंदिर उभारणीत वाटा आहे, असेही शिरसाट म्हणाले.