सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोधच : वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 11:14 AM2020-01-20T11:14:04+5:302020-01-20T11:16:11+5:30
सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही.
मुंबई : सावरकरांवरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच केलं होतं. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. नागपूर येथे माध्यमांशी ते बोलत होते.
सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध असणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तर सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ”, असेही ते म्हणाले.
तसेच भविष्यात संजय राऊतांनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे,’ अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.