सत्तापक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा
By admin | Published: April 6, 2017 05:13 AM2017-04-06T05:13:19+5:302017-04-06T05:13:19+5:30
महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) सुधारणा विधेयकास मंजुरी दिल्याने सत्तापक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा मार्ग आज प्रशस्त झाला.
मुंबई : विधानसभेने आज महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) सुधारणा विधेयकास मंजुरी दिल्याने सत्तापक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा मार्ग आज प्रशस्त झाला. अर्थात विधान परिषदेची मंजुरी बाकी आहे.
या विधेयकातील तरतुदीनुसार मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्र्यांचा तर प्रतोदांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळेल. तथापि, हा फायदा फक्त सरकार स्थापनेसाठी भूमिका बजावलेल्या पक्षांनाच मिळेल. विधानसभेत भाजपाचे मुख्य प्रतोद हे राज पुरोहित आहेत तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू आहेत. विधान परिषदेत भाई गिरकर हे भाजपाचे मुख्य प्रतोद आहेत. या तिघांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळू शकतो.स्वतंत्र कार, बंगला या सुविधाही त्यांना पुरविल्या जातील. विधान परिषदेत डॉ.नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या प्रतोद आहेत. विधानसभेत भाजपा आणि शिवसेनेचे मिळून १४ प्रतोद आहेत. या सगळ्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळेल. (विशेष प्रतिनिधी)