मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर!
By Admin | Published: November 25, 2015 03:11 AM2015-11-25T03:11:05+5:302015-11-25T03:11:05+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत असून, विस्ताराची नेमकी तारीख ते अद्याप ठरवू शकलेले नाहीत
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत असून, विस्ताराची नेमकी तारीख ते अद्याप ठरवू शकलेले नाहीत. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन होईपर्यंत विस्तार लांबणीवर टाकण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी विस्ताराबाबत चर्चा केली होती. शहा यांनी विस्तारास हिरवा झेंडा दाखविला असला, तरी भाजपामधून कोणाला संधी द्यायची, यावर एकमत होत नसल्याने विस्तार पुढे ढकलला जाऊ शकतो.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोन मित्रांना मंत्रिपद देण्याची तयारी भाजपाने दर्शविली आहे. रामदास आठवले स्वत: राज्यात मंत्री होणार असतील, तरच त्यांच्या पक्षाला संधी देऊ, अशी अट भाजपाने टाकली आहे. मित्रपक्षांना मान्य होईल, असे सूत्र निश्चित करण्यात भाजपाला अद्याप यश आलेले नाही. शिवसेनेला दोन मंत्रिपदे भरायची आहेत, पण त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी अद्याप नावेदेखील मागविलेली नाहीत. सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही मंत्रिपदाची मागणी करीत आहेत. हे सगळे निस्तारण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागू शकतात. त्यामुळे विस्तार लांबणीवर पडू शकतो.
त्यातच मुख्यमंत्री फडणवीस, ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष शहा यांची एकमेकांशी चर्चा झाल्यानंतरच नावे अंतिम होतील, असे मानले जाते. विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. नवीन मंत्र्यांना किमान पाच दिवस आधी म्हणजे २ डिसेंबरपर्यंत शपथ द्यावी लागेल. म्हणजे त्यांना आपापली खाती किमान अधिवेशनाला सामोरे जाण्यासाठी समजून घेता येतील.
ही सगळी अडथळ्यांची शर्यत पार करीत, मंत्र्यांचा शपथविधी करण्यापर्यंतची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार केला, तर पक्षांतर्गत राजी-नाराजीचा परिणाम अधिवेशनावर होऊ शकतो. त्यापेक्षा विस्तार अधिवेशनानंतरच करावा, असा एक मतप्रवाह भाजपात आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे मात्र अधिवेशनापूर्वीच विस्तारासाठी आग्रही असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)