कॉल सेंटर घोटाळ्यातील कार होती कोहलीच्या नावावर

By admin | Published: October 28, 2016 06:05 PM2016-10-28T18:05:44+5:302016-10-28T22:29:19+5:30

कॉल सेंटर घोटाळ्याप्रकरणी आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.

The call center was a scam in the name of Kohli | कॉल सेंटर घोटाळ्यातील कार होती कोहलीच्या नावावर

कॉल सेंटर घोटाळ्यातील कार होती कोहलीच्या नावावर

Next

जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 28 - मीरा रोड येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना सुमारे ५०० कोटींचा गंडा घालणाऱ्या घोटाळ्यातील कथित सूत्रधार सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याने भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडून खरेदी केलेली तीन कोटींची ऑडी आर-८ ही कार आता ठाणे पोलिसांनी हरियाणातून हस्तगत केली आहे. त्याने कार खरेदीचा हा व्यवहार कोहलीकडून कशा प्रकारे केला, याबाबतची सर्व चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. तर आरटीओने फार्म २९ भरून घेतला असला तरी ही कार अद्यापही कोहलीच्याच नावावर असल्याचे तपास पथकातील अधिकाऱ्याने सांगितले.

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाकडून या बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा तपास सुरू आहे. मीरा रोडमधील डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून सात कॉल सेंटर चालवले जात होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट पोर्टल) वरून कॉल केला जायचा. अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू ऑफिसर्स असल्याची बतावणी करीत अनेकांना टॅक्स चुकवल्याचे सांगून खटला दाखल करण्याचीही धमकी दिली जायची. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत ७४ जणांना अटक केली असून त्यातील शॅगी या सूत्रधाराचा शोध सुरू आहे. त्याला ‘लूकआउट’ नोटीसही जारी केली आहे. त्याने आपल्या एका मैत्रिणीला भेट देण्यासाठी ऑडी आर-८ या कारची खरेदी केली होती. ती त्याने भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती तपासात उघड झाल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. अर्थात, शॅगीची कोणतीही पार्श्वभूमी तसेच कॉल सेंटर घोटाळ्यातील त्याचा सहभाग याबाबतची कोणतीही माहिती विराट कोहलीला नव्हती, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. कॉल सेंटर घोटाळ्यातून जमवलेल्या अवैध पैशांतून त्याने विराटकडून ही कार खरेदी केल्याची माहिती हाती आल्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले. हरियाणाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी असलेली एच आर-२६-बीडब्ल्यू या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार हरयाणा येथून सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ठाण्यात आणली. ती कोहलीची असल्याची वार्ता पोलीस वर्तुळात पसरताच अनेकांनी ती पाहण्यासाठी आयुक्तालयाच्या आवारात गर्दी केली होती. 
.......................
ऑडी अजूनही कोहलीच्याच नावावर
ही कार शॅगीने एका दलालाकडून खरेदी केली. खरेदी केल्यानंतर तिची कागदपत्रे त्याच्या नावावर करण्यासाठी पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे तो देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे फॉर्म क्रमांक २९ हा भरला असला तरी ही कार अजूनही कोहलीच्याच नावावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. दिल्ली आणि अहमदाबाद परिसरात राहणाऱ्या त्याच्या एका मित्राकडे ही कार असून ती हरियाणातील रोतक शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर चार दिवसांपूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतली. चार दिवसांच्या प्रवासानंतर ती शुक्रवारी ठाण्यात आणल्याचेही पोलिसांनी सांगितले.
 
 


या कारच्या खरेदीनंतर शॅगीने ती आपल्या अहमदाबादच्या प्रेयसीला भेट दिली होती. कॉल सेंटर घोटाळ्यातील आणखी एक संशयित आरोपी आणि शॅगीची बहीण रीमा हिच्यासोबत तो दुबईत असल्याचे बोलले जाते. त्यांचे काही नातेवाईक तिकडे असल्यामुळे हे दोघेही तिकडे लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लवकरच भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. बोरिवलीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला शॅगी कालांतराने अहमदाबाद येथे स्थलांतरित झाला. तिथेच त्याने बनावट कॉल सेंटरची शक्कल लढवली. आधी अहमदाबादमध्ये या बनावट कॉल सेंटरचे जाळे उभे केल्यानंतर त्याने ठाणे जिल्ह्यातील भार्इंदर परिसरातील मीरा रोडमध्येही कॉल सेंटरचा हा पसारा उभा केला. 
५ ऑक्टोबर रोजी मीरा रोड परिसरातील १२ कॉल सेंटरवर धाड टाकून हा करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला. या धाडीत एकाच वेळी ७७२ जणांना पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. अलीकडेच अटक केलेला शॅगीचा साथीदार जगदीश कनानी याच्या चौकशीतूनही शॅगीची बरीच माहिती पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: The call center was a scam in the name of Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.