शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा!, विरोधी पक्षांचे राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2017 05:20 PM2017-05-02T17:20:00+5:302017-05-02T17:20:00+5:30

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली

Call a special session for farmers' debt waiver! | शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा!, विरोधी पक्षांचे राज्यपालांना साकडे

शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा!, विरोधी पक्षांचे राज्यपालांना साकडे

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीने रोखण्यासाठी कर्जमाफीशिवाय तरणोपाय नसून, सदरहू घोषणा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण तातडीने नियंत्रणात आणायचे असेल तर सरकारने विशेष अधिवेशन बोलावून कर्जमाफीची घोषणा करणे अत्यावश्यक झाले आहे, असे विखे पाटील यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.

शासकीय तूर खरेदीतील अनागोंदी कारभाराबाबतही राज्यपालांना अवगत करण्यात आले. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. नुकसानभरपाई देत नाही. आता शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाची खरेदी करायला अन् भाव द्यायलाही सरकार तयार नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. सरकारच्या नियोजनशून्य व उदासीन कारभारामुळे संपूर्ण तुरीची शासकीय खरेदी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर अत्यल्प दराने व्यापाऱ्यांना विकावी लागली. याची नुकसानभरपाई म्हणून तूर उत्पादकांना बोनस देण्याची मागणी त्यांनी मांडली. शेतकऱ्यांची हलाखीची आर्थिक स्थिती पाहता कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणीही विखे पाटील यांनी याप्रसंगी केली.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी देखील राज्यपालांना शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत माहिती दिली. सदरहू शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यपालांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, संयुक्त जनता दलाचे आ. कपिल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने आमदार उपस्थित होते.  

Web Title: Call a special session for farmers' debt waiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.