मराठा आरक्षणासाठी तात्काळ विधिमंडळाचे अधिवेशन बोलवा, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:50 PM2018-07-30T17:50:02+5:302018-07-30T17:51:00+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू झालेले आंदोलन हिंसक रूप घेत असतानाच विविध राजकीय पक्षांनिही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू झालेले आंदोलन हिंसक रूप घेत असतानाच विविध राजकीय पक्षांनिही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
शिवसेना नेत्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्रक दिले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सद्यस्थिती महाराष्ट्रामध्ये असलेल्या चिंताजनक परिस्थितीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. तसेच इतर समाजांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करता आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा ठराव विधिमंडळात एकमताने संमत करून संसदेकडे पाठवावा, त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवावे, असे एकमताने ठरले. दरम्यान, या ठरावाची प्रत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत या प्रस्तावास शिवसेनेचा विधानसभा, विधानपरिषद आणि संसदेमध्ये पूर्ण पाठिंबा असेल, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.