उद्याच्या पिढीमुळेच कॅलिग्राफी बहरेल; रसिकांनी अनुभवली अक्षरे वळविण्याची ताकद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 07:29 AM2021-12-05T07:29:20+5:302021-12-05T07:29:45+5:30
चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे, त्यामुळे त्याचादेखील आम्ही सन्मान करतो. आपल्या साहित्य संमेलनाचा परिघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे.
नाशिक : बालकांनी जमेल तेवढी चित्रे पहावी, रंगांशी मनसोक्तपणे खेळावे, यातूनच उद्याचे चित्रकार, कलाकार घडणार आहेत. उद्याची पिढीदेखील कॅलिग्राफीला तितकाच प्रतिसाद देत असल्याने कॅलिग्राफी भविष्यात निश्चितपणे बहरेल, असा विश्वास प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘ऐसी अक्षरे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अच्युत पालव यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक सन्मान दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट देऊन छगन भुजबळ यांनी अच्युत पालव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे, त्यामुळे त्याचादेखील आम्ही सन्मान करतो. आपल्या साहित्य संमेलनाचा परिघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, चित्रकला, कॅलिग्राफी, शिल्पकला प्रदर्शनाचा कार्यक्रमदेखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकला ही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पाडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात, असे भुजबळ यांनी सांगितले.