"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:48 IST2025-01-13T11:36:05+5:302025-01-13T11:48:35+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान"; बावनकुळे म्हणाले, "अमित शाह योग्यच बोलले"
Amit Shah on Uddhav Thackeray: शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले, असं म्हणत अमित शाह यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह योग्यच बोलले असल्याचे म्हटलं आहे.
शिर्डी येथील भाषणात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं, अशी टीका अमित शाह यांनी केली. यानंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज करुन बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचे राऊत यांनी म्हटलं.
"उद्धव ठाकरेंनी दगाफटका केलेला नाही. भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह हे योग्य बोलले असल्याचे म्हटलं.
"अमित शाह असं म्हणाले की फोडाफोडीचे राजकारण या महाराष्ट्रामध्ये १९७८ पासून सुरू होतं. मधल्या काळात २०१९ मध्ये फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्याशी दगा फटका केला आणि तो महाराष्ट्राला सहन झाला नाही. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा २०२४ चे सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं. आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठे बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने का दिल याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीने ज्याप्रकारे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार विकसित करण्यासाठी महाराष्ट्रासाठी जनतेने आम्हाला साथ दिली," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
"अमित शाह यांच्या कालच्या भाषणात एक दिशा होती. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली दगाफटका केला मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना जे अमित शाह बोलले ते योग्यच बोलले आहेतय त्यांनी तसं केलं म्हणून अमित शहा यांनी तसे शब्द वापरले आहेत," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.