सुरक्षित मातृत्वासाठी शिबिर
By admin | Published: June 13, 2016 02:17 AM2016-06-13T02:17:14+5:302016-06-13T02:17:14+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित मातृत्वासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कामशेत : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षित मातृत्वासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटन सरपंच रोहिणी मुथा यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. सोनल बोंद्रे, वैद्यकीय अधिकारी अनिल गिरी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अभियानांतर्गत प्रत्येक महिन्यात ९ तारखेला गरोदर स्त्रियांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येणार आहे. रक्ताच्या आवश्यक सर्व तपासण्या व स्त्रीरोग तज्ज्ञाकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे. गर्भवतींना लागणारी सर्व औषधे मोफत देण्यात येणार आहेत. माता आणि अर्भक मृत्यू दर कमी करण्याबरोबरच अतिजोखमीच्या माता ओळखून योग्य तो औषधोपचार आणि संदर्भ सेवा मिळावी हा या मागचा हेतू आहे.
शिबिरात गरोदरपणात कोणती काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे, असा सल्ला देण्यात आला. रक्तवाढीसाठी आवश्यक असणारे शेंगदाणे, खजूर, चिक्की, राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले .
केंद्रात येणाऱ्या सर्व गर्भवतींना प्रसूतीसाठी मोफत वाहनव्यवस्था, मोफत औषधे, मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात येते. प्रसूतीनंतर बालकाचे संपूर्ण लसीकरण मोफत करण्यात येते. मातेला व त्याच्या बाळाला उपयुक्त वस्तूंचे किट मोफत देण्यात येते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. बोंद्रे, सरपंच मुथा यांनी मार्गदर्शन केले. आरोग्यसेविका मंगल साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गिरी यांनी आभार मानले. (वार्ताहर)