‘शाळांत लैंगिक शोषणाबाबत मोहीम राबवा’ , उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:37 AM2018-03-01T03:37:02+5:302018-03-01T03:37:02+5:30
लैंगिक शोषणासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली.
मुंबई : लैंगिक शोषणासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली.
इयत्ता पाचवीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शोषणासंदर्भात जागृती निर्माण करा. दृढ नाते, लैंगिक शोषणासंदर्भात त्यांना माहिती द्या. या मोहिमेत पुरुषांनाही सहभागी करून घ्या. घरगुती हिंसाचारांच्या केसमध्ये बहुतांशी पुरुष आरोपी असतात. त्यामुळे या मोहिमेत मुले, वडील, पती यांनाही सहभागी करून घ्या. त्यामुळे महिलांशी कसे वागायचे, ते त्यांनाही समजेल, असे न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी म्हटले.
शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाने न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयानेही शाळांमध्ये ही मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे म्हटले.
‘दृढ नात्या’चा अर्थ विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. राज्य महिला आयोगातील रिक्त पदे भरण्यात यावीत, आयोगाच्या शाखा राज्यातील लहान व दुर्गम भागातील जिल्ह्यांमध्ये सुरू कराव्यात यासाठी पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.