शिवार सोडून शेतमजूर उतरले प्रचारात
By Admin | Published: February 11, 2017 05:37 PM2017-02-11T17:37:18+5:302017-02-11T17:37:18+5:30
ग्रामविकासाचा बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने चारचाकी वाहनधारक, रिक्षाचालकांसह शेतमजुरांनाही मोठा रोजगार दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 11 - ग्रामविकासाचा बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने चारचाकी वाहनधारक, रिक्षाचालकांसह शेतमजुरांनाही मोठा रोजगार दिला आहे. मजुरांना १५० रुपयांसोबत चमचमीत भोजनही मिळते. त्यामुळे शिवार सोडून मजूर प्रचारात अधिक दिसू लागले आहेत. यातच अनेक ठिकाणी दारू व मांसाहारी पार्ट्यांना ऊत आला असून, मतदारांसाठी रोज सायंकाळी दारू व मांसाहारी भोजनाची व्यवस्थाही काही उमेदवार करीत आहेत.
ग्रा.पं. निवडणुकांनंतर ग्रामीण भागात जि.प.च्या निवडणुकांना अधिक महत्त्व असते. व्यक्ती कसा आहे याचा विचार करून सर्व गणिते ठरतात. अर्थातच जो उमेदवार आर्थिक संपन्न आहे त्याच्याकडे येणा-यांची संख्याही अधिक आहे. आर्थिक संपन्न उमेदवार अनेकांचा रोजगाराचा स्त्रोतही या निवडणुकीमध्ये बनले आहेत.
आला रे..., आला रे..., असा चकाट्या पिटायच्या आणि दिवसभर आपल्या उमेदवाराच्या मागे फिरायचे. सकाळी एखाद्या देवस्थानावर सात्विक भोजन असते... नंतर सायंकाळी गटागट कार्यक्रमासोबत मांसाहारी भोजनावर ताव मारायला मिळतो. यामुळे अनेक जण सध्या खूश आहेत. मजुरीही रोकड स्वरुपात सायंकाळी हातात पडते.त्यामुळे कमाई सोबत भोजन आणि चारचाकीमधून इकडून तिकडे फिरणे... असा तिहेरी आनंद योग अनेक जण अनुभवत आहेत.
शेतातही मोजकी कामे
सध्या कृत्रिम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतक-यांकडेही फारशी कामे नाहीत. केळीच्या शेतांमध्ये तळ नियंत्रण, पूर्वहंगामी कापसात वेचणीची कामे तेवढी आहेत. ही कामे चार पाच दिवस प्रलंबित राहिली तरी फारसा परिणाम होत नसल्याने शेतकरीही मजुरांअभावी फारसे त्रस्त नसल्याचे चित्र आहे. अशात रोज सकाळ झाली की ज्या उमेदवाराची वाहने दिसतील त्यात मजूर मंडळी बसतात व पुढे निघतात.
रिक्षाचालक, चारचाकीधारकांनाही रोजगार
रोज प्रवाशांच्या प्रतिक्षेत राहणा-या खाजगी रिक्षाचालक, चारचाकी वाहनधारक यांनाही रोज प्रचारानिमित्त रोजगार मिळत आहे. रिक्षाचालकास रोज ५०० रुपये रोज आणि इंधनाचा खर्च मिळतो. इंधनाचा रोजचा खर्च निश्चित असतो. तर चारचाकीधारकांना चारचाकीच्या स्थितीनुसार रोज पैसे मिळत आहेत. जेवढी अधिक गर्दी तेवढी अधिक वाहने प्रचारात दिसतात. वाहने अधिक असली तर त्याची चांगली छाप मतदारांवर पडते. गर्दी जमविल्याशिवाय कुणी आकर्षित होत नाही. म्हणून अनेक उमेदवारांनी अधिकाधिक चारचाकी वाहने आपल्या प्रचारात असावीत यावर भर दिलेला दिसून येत आहे. चारचाकी चालकास ५०० रुपये रोज, इंधनाचा खर्च व चारचाकीचे भाडेही दिले जाते.