डॉक्टर संप करू शकतात का?
By admin | Published: April 13, 2016 02:20 AM2016-04-13T02:20:05+5:302016-04-13T02:20:05+5:30
डॉक्टरांचा व्यवसाय ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना संप करण्याचा अधिकार आहे का? असा थेट सवाल उच्च न्यायालयाने मार्डला केला आहे. यापुढे अशाप्रकारे संप करून
मुंबई : डॉक्टरांचा व्यवसाय ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना संप करण्याचा अधिकार आहे का? असा थेट सवाल उच्च न्यायालयाने मार्डला केला आहे. यापुढे अशाप्रकारे संप करून रुग्णांना वेठीस न धरण्याची हमी डॉक्टरांकडून लिहून घेण्याचे संकेत उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत, तर दुसरीकडे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. ‘तक्रार निवारण समिती’ डॉ. लहानेंवरील आरोपांची चौकशी करणार नाही, अशी माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली.
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी रहिवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करू न देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवासी डॉक्टरांनी संप पुकारला. डॉ. लहाने व नेत्रचिकित्सा विभागप्रमुख रागिणी पारेख यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली. संपाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी कोर्टात अर्ज केला. सुनावणीत कोर्टाने डॉक्टरांना संप करण्याचा अधिकार आहे का? अशी विचारणा मार्डकडे केली.
‘आज नाही तर उद्या तुम्हाला (मार्ड) या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. फिरते खंडपीठ हवे, म्हणून राज्यातील सहा जिल्ह्यांतील वकिलांनी संप पुकारला. त्यांच्याकडून संपावर न जाण्याची हमी घेऊनही त्यांनी हे कृत्य केले. त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांनी संप पुकारल्यावर त्यांच्यावर अवमान नोटीस बजावली. तुम्हालाही (डॉक्टर) हमी देण्याची वेळ येणार आहे. मुळातच तुम्ही संपावर जाऊ शकता का, हा प्रश्न आहे,’ अशा शब्दांत न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांनी मार्डला धारेवर धरले. (प्रतिनिधी)
ही चौकशी समिती नाही
डॉ. लहाने यांनी सरकारकडून करण्यात येणाऱ्या चौकशीवर आक्षेप घेतला. त्यावर खंडपीठाने नव्याने नेमण्यात येणारी समिती डॉ. लहाने यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करणार का? अशी विचारणा सरकारकडे केली.
त्यावर प्रभारी महाअधिवक्ता रोहित देव यांनी ही तक्रार निवारण समिती आहे, चौकशी समिती नाही. त्यामुळे डॉ. लहाने यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाणर नाही, असे स्पष्ट करत, डॉ. लहाने यांना दिलासा दिला.