प्राचार्य विनयभंग करू शकतात ?
By admin | Published: May 23, 2017 07:33 AM2017-05-23T07:33:26+5:302017-05-23T07:33:26+5:30
सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप ज्योतीराम खडतरे यांनी आपल्याच चार-पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला
Next
>राजा माने / ऑनलाइन लोकमत
कुणी साले म्हणतो, कुणी साल्यालाच मैदानात येण्याचे आव्हान देतो, तर कुणी साले म्हणणाऱ्यांची सालपटे लोळवण्याची भाषा करतो... बरं हे सगळं कशासाठी तर आपल्या बळीराजासाठी...! सगळ्यांच्याच फक्त तोंडच्या वाफा निघताहेत. उन्हाचा तडाखा, तुरीचा फटका अन् जीएसटीचा धसका यामुळे उभा महाराष्ट्र घामेघूम झाला आहे. उत्तरेत योगी महाराजांनी बळीराजाला खूश केले पण महाराष्ट्रात देवेंद्र महाराजांची का बरे खफामर्जी? जाऊ द्या, पण आमच्या भोळ्या पांडुरंगाला मात्र सगळंच निस्तारावं लागतंय. बघा ना, काल आमच्या विदर्भातील बळीराजांनी पंढरीत येऊन विठुरायाला साकडे घातले. कर्जमाफी, आत्महत्या, विचारमुक्ती आणि बऱ्याच मागण्या त्याच्याकडे केल्या. खरंच विठुरायासारखे सगळेच भोळेभाबडे ! आता विठुराया कसा मार्ग काढणार? काय करावे, त्यालाही भक्ताच्या संकटमोचनातून उसंत मिळायला हवी ना! पंढरीतच परवा एका सरस्वतीपूजकाने विठ्ठलाच्याच नावाने असलेल्या एका कॉलेज इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. होय, मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या प्राचार्याबद्दलच सांगतोय... सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप ज्योतीराम खडतरे यांनी आपल्याच चार-पाच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. नीतीमूल्ये आणि समाजाची काळजी असणाऱ्या काही तरुणांनी त्या आरोपांवरून प्राचार्यांना गचांड्या दिल्या, तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला पण चपळ प्राचार्यांनी तेथून धूम ठोकण्यात यश मिळविले. घटना येथेच थांबली नाही तर दुसऱ्या दिवशी प्राचार्यांनी पंढरपुरात जाऊन त्यांचा कुठलाही संबंध नसलेल्या कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ती करण्यापूर्वी एक पत्रही त्यांनी लिहून ठेवले. ‘प्रतिगामी शक्ती’चे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचे षड्यंत्र असल्याचा दावा त्यांनी त्या पत्रात केला. ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राच्या डोळ्यात अंजन घालणारी अशीच ही घटना. ५७ वर्षे वयाचा आणि तब्बल २६ वर्षे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर आयुष्य घालविलेल्या वर्ष-दीड वर्षाच्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत आपल्याच विद्यार्थिनींचा विनयभंग करू शकतो? हा भोळाभाबडा प्रश्न तुमच्या-माझ्या मनात उभा राहिल्याशिवाय राहत नाही. प्राचार्यांनी आपल्या मृत्यूपत्रात त्यांच्या मृत्यूसाठी आपली संस्था, संस्थाचालक, सहकारी या सर्वांना जबाबदार धरलेले नाही. मग षड्यंत्र कोणाचे? मुलंबाळं आणि घरसंसार असणारा प्राचार्य अकरावी, बारावीच्या मुलींशी असभ्य वर्तन करतो हा विचारच डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे. बा विठ्ठला ! आता या झिणझिण्या तूच कमी कर रे बाबा !! षड्यंत्र असेल तर त्याचे सूत्रधार कोण? प्राचार्यांनेच कुकर्म केले असेल तर २६ वर्षे शिक्षण क्षेत्राने हा कुकर्मी सहन का केला? या सगळ्या प्रकारात प्राचार्यांच्या कुटुंबीयांचा काय दोष? त्यांनी आता काय करावे? तथाकथित पीडित मुलींच्या आणि तिच्या आई-वडिलांची आज काय अवस्था असेल? त्याहून महत्त्वाचे ग्रामीण भागात असे ओंगळवाणे प्रकार शिक्षण क्षेत्रातच वाढू लागले तर बाहेरगावी विश्वासाने आपल्या लेकींना शिकायला धाडणाऱ्या आई-वडिलांनी ते धाडस कुणाच्या विश्वासावर करायचे? विठ्ठला, आता तुला कुठल्या-कुठल्या प्रश्नांची उकल करण्याचे साकडे घालू? पण, जे घडतंय ते पाहून तुलाही कंबरेवरील आपले दोन्ही हात खुले करून कोणाच्यातरी कानफटात वाजवावी वाटेल अशीच आजची परिस्थिती आहे.
राजा माने, संपादक, लोकमत, सोलापूर