आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसू लागलेत; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 08:24 AM2021-10-16T08:24:49+5:302021-10-16T08:25:17+5:30
Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्टपणे दिसतात, यात कोणतीही शंका नाही, असं म्हणत नितेश राणेंनी लगावला टोला.
"आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आमचा आवाज दाबवणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही," अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून (Shivsena Dasara Melava 2021) विरोधकांवर हल्लाबोल केला. "काही जण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहताहेत. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातूनच त्यांना रोजगार मिळतो," असा टोलाही त्यांनी लगावला होता. दरम्यान, दसरा मेळाव्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
"दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही," असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
After Dussehra speech..
— nitesh rane (@NiteshNRane) October 15, 2021
With full confidence I can say..
Humko uddhavji mein Rahulji ekdum clear dekte hain!!!
Koi doubt nahi!!
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात," असं ठाकरे म्हणाले.
हिंमत असेल तर पाडून दाखवा
"तुमच्या आशीर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत," असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
"देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब स्वातंत्र्य लढ्यात पुढे होता. बंगाली जनतेने धडा शिकविला त्या बंगाली जनतेचे आणि ममता दीदींचे अभिनंदन करतो. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.