भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 08:08 PM2024-11-16T20:08:19+5:302024-11-16T20:09:15+5:30
Uddhav Thackeray : "कृपाकरून तुम्ही नात्याची गफलत करू नका, माझे नाते नाते महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणार्याला मी पाठिंबा देऊ शकत नाही," असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. अशातच, भविष्यात मनसेसोबत युती होऊ शकते का? यासंदर्भात शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. "हे बोलणे अत्यंत क्लेशकारक आहे. पण माझे नाते माझ्या महाराष्ट्रासोबत आहे. तो लुटला जातोय, हे मी उघड्या डोळ्याने बघू शकत नाही आणि त्या लुटारूंना मदत करणार्यांना मी मदत करणे म्हणजे, मी महाराष्ट्रासोबत विश्वासघात करतोय. महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्यासोबत मी युती करूच शकत नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत जसे सांगितले, की महाराष्ट्राचे लुटारू नकोत. त्यांनी तर जाहीर केले आहे की कोण मुख्यमंत्री व्हायला हवा. मग जर तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्याला त्यांचा पाठिंबा असेल, तर त्यांच्यासोबत माझी युती होऊ शकत नाही. मी माझ्या महाराष्ट्राशी बांधिल आहे."
"माझ्या वडिलांनी, हिंदू हृदय सम्राटांनी, शिवसेनेची स्थापना महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसाच्या न्यायासाठी केली. ती महाराष्ट्राच्या लुटारूंना सत्तेवर बसवण्यासाठी नाही केली. त्यामुळे, मी ज्या पद्धतीने माझे धोरण स्पष्ट केले आहे, त्याप्रमाणे, त्यांनीही त्यांचे धोरण स्पष्ट करावे. आतसेच, त्यांनी सर्वात पहिले त्यांच्या पक्षाचे नाव काय आहे, 'मनसे' आहे की 'गुणसे'? हेही ठरवावे," असेही ठाकरे म्हणाले.
एवढेच नाही तर, "कृपाकरून तुम्ही नात्याची गफलत करू नका, माझे नाते नाते महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणार्याला मी पाठिंबा देऊ शकत नाही," असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.