कालव्याची कामे निकृष्ट

By admin | Published: April 6, 2017 12:51 AM2017-04-06T00:51:25+5:302017-04-06T00:51:25+5:30

नीरा डावा कालव्याच्या भरावावरील खड्डे मुरुमाऐवजी काळी माती टाकून बुजविण्याचा प्रकार पाटबंधारे (जलसंपदा) खात्याने सुरू केला

Canal works disproportionate | कालव्याची कामे निकृष्ट

कालव्याची कामे निकृष्ट

Next

सोमेश्वरनगर : नीरा डावा कालव्याच्या भरावावरील खड्डे मुरुमाऐवजी काळी माती टाकून बुजविण्याचा प्रकार पाटबंधारे (जलसंपदा) खात्याने सुरू केला आहे. वास्तविक भरावावरून नागरिकांची वहिवाटदेखील असते. त्याचबरोबर दुचाकी गाड्यादेखील जातात. त्यामुळे काळ्या मातीने बुजविलेले खड्डे किती दिवस टिकणार, असा प्रश्न आहे.
नीरा डावा कालवा हा वीर धरणापासून ते इंदापूरपर्यंत जातो; मात्र हा कालवा अनेक ठिकाणी खचलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. सन १९८९-९० मध्ये या कालव्याच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्या वेळी कालव्यामधून निघणारा कच्चा माल भरावावर टाकून कालव्याची उंची वाढविण्यात आली होती; मात्र तेव्हापासून आजपर्यंत पाटबंधारे खात्याकडून या कालव्यावर साधा एक ट्रॉली मुरूमही टाकण्यात आला नाही. फक्त ज्याठिकााणी कालवा फुटण्याचा धोका वाटतो त्याच ठिकाणी फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जाते.
सध्या या खात्याने कालव्यालगतची झाडे काढण्याचे कामकाज हाती घेतले असून, कालव्यावरील खड्डे काळी माती टाकून बुजविण्यात येत आहेत. (वार्ताहर)
बारामती, इंदापूर व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डाव्या आणि नीरा उजव्या कालव्यासह नीरा नदीवरील सर्वच पूल, पालथ्या मोऱ्या आणि वितरिका यांची ‘एक्सपायरी डेट’ संपली आहे. याकडे पाटबंधारे खात्याने लक्ष देण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणांवरची ब्रिटिशकालीन यंत्रणा अजून बदलेली नाही.
कालव्याला झाडाझुडपांनी विळखा दिला आहे, तर गावोगावचे पाणवटे व घाट ही उद्ध्वस्त झाले आहेत. गेली कित्येक वर्षे कालव्याच्या वितरिकेचे विमोचक बदलले नाहीत. ते जीर्ण झाले आहेत. पाणी सोडण्याची प्रक्रिया अवघड बनली आहे. वितरिकांमधून पाण्याची गळती वाढली आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या कालव्याचे कुठलेही काम पाटबंधारे विभागाने केले नाही.
कालव्याच्या माथ्यावर मुरूम टाकणे, झाडेझुडपे तोडणे ही कामे तर केल्याची लोकांना आठवतच नाहीत. नीरा डाव्या कालव्याची लांबी १५२ किलोमीटर आहे. या अंतरात जवळपास ६२ वितरिका (फाटे) येतात. यापैकी ८० टक्के वितरिका नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. याकडे पुलांकडे व कालव्यावरील विविध बांधकामांकडे पाटबंधारे खात्याने वेळेत लक्ष देण्याची गरज आहे.
खडकवासला कालव्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश
भिगवण : खडकवासला कालव्याचे चारी क्र. ३६ चे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने संपूर्ण कामाची चौकशी करण्याचा आदेश सहायक मुख्य अभियंता जलसंपदा विभागाकडून काढण्यात आला आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून प्रवीण कोल्हे कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन मुठा उजवा कालवा वितरिका ३६ मध्ये मातीकाम अस्तरीकरण आणि बांधकामाच्या कामात ठेकेदार आणि पाटबंधारे अधिकारी यांनी संगनमत करीत हलक्या दर्जाचे काम करून त्या कामात मोठा आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सचिव संतोष सोनावणे यांनी केली होती. या तक्रारीची माहिती घेण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची पाहणी केली असता तक्रारदार सोनावणे आणि शेतकरी यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले.
यावर कार्यालयाला आपला रिपोर्ट पाठवून यासंदर्भात पुढील कारवाई करावी, असे सांगण्यात आले होते. यावर मुख्य अभियंता जलसंपदा विभागाकडून चौकशी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र तक्रारदारांना देण्यात आले आहे. तक्रारदार संतोष सोनावणे यांनी या कामात भ्रष्ट असणारे शाखा अधिकारी, उपअभियंता आणि ठेकेदार यांची चौकशी होऊन दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Canal works disproportionate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.