९० वर्षांचे भाडेकरार रद्द करा
By admin | Published: January 7, 2016 01:17 AM2016-01-07T01:17:33+5:302016-01-07T01:17:33+5:30
बाजार समितीला आदेश : ‘शाहू सांस्कृतिक’बाबत निर्णय घ्या - अरुण काकडे
कोल्हापूर : ‘शाहू सांस्कृतिक मंदिर’ सोबत झालेला करार रद्द करण्यासाठी मिळणारे उत्पन्न पाहून निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी बाजार समितीला बुधवारी दिले. तसेच बाजार समितीने ९० वर्षे मुदतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या प्लॉटचे करार रद्द करून भाडेपट्टीची मुदत तीस वर्षे करण्याचे आदेश त्यांनी दिले.
समितीच्या माजी संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी बाजार समितीमध्ये साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. ‘शाहू सांस्कृतिक’चा करार मोडला, तर ३५ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे, पण ‘शाहू सांस्कृतिक’चा वर्षाला केवळ एक लाख रुपये भाडे व दर तीन वर्षांनी त्यामध्ये १५ टक्के वाढ, असा करार झाला आहे. त्यामुळे सध्या १ लाख ६० हजार भाडे मिळते, पण पंचरत्न कंपनी वर्षाला ५० लाख कमावते. हा करार मोडला तर ३५ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे, उत्पन्न पाहून याबाबत निर्णय घेण्याचे आदेशही जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याबाबत दोन महिन्यांत कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.
गत दहा वर्षांत समितीमध्ये बेकायदेशीर प्लॉट वाटप झालेले आहे. ९० वर्षे इतक्या दीर्घमुदतीने प्लॉटचे करार झाले आहेत, पण पणन कायद्यानुसार तीस वर्षांपेक्षा अधिक काळ भाडेकरार करता येत नाही. कायद्यानुसार संबंधित प्लॉटचे करार रद्द करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले. समितीतील बोळ, रस्त्यांवर बेकायदेशीर प्लॉट पाडून त्याचे वाटप केले आहे, ते रद्द करावेत, असेही आदेश दिले आहेत.
कुलकर्णींची वसुली करा
समितीचे कनिष्ठ अभियंता यांच्यावर केलेली जबाबदारी निश्चितीची वसुली तातडीने करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला दिले आहेत. प्रशासनाने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.