‘अॅट्रॉसिटी’ रद्द करा, ही मराठ्यांची मागणी नाही
By admin | Published: September 21, 2016 05:50 AM2016-09-21T05:50:52+5:302016-09-21T05:50:52+5:30
अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा अशी मागणी मराठा समाजाच्या मोर्चांमधून कुठेही समोर आलेली नाही
मुंबई : अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा अशी मागणी मराठा समाजाच्या मोर्चांमधून कुठेही समोर आलेली नाही. पण या कायद्याचा गैरवापर होऊ नये, अशी सर्वांची भूमिका असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ग्रामीण भागातील राजकारणात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे, त्यामुळे लोकांच्या मनात राग आहे. हा कायदा रद्द करावा असे आमचे मत नाही; पण गुन्हा नोंदवताना या कायद्याचा गैरवापर केला जाऊ नये हा लोकांचा आग्रह असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
मराठा समाजात पसरलेला हा असंतोष गेल्या १५ वर्षांतील आहे की, सत्तेची दोन वर्षे पूर्ण करत असलेल्या भाजपा-शिवसेना सरकारच्या विरोधात आहे, असे विचारले असता खा. चव्हाण म्हणाले, लोक नाराज आहेत. कोणाच्या काळातला हा असंतोष आहे हा विषय येथे नाही. आम्ही जे काही केले त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही विरोधात आहोत; पण या सरकारने काहीच केलेले नाही हा रागही आहेच, असे खा. चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांनी काँग्रेससह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसमुळेच आमचा पराभव झाल्याचे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता खा. चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम आमचे नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा सन्मान कायम राखूनच युती केली जाईल असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
>‘आम्ही आमचा पक्ष वाढवू’
राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम आमचे नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवू. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्याकडे बिल्डरांच्या फायली घेऊन यायचे, असे त्यांनी सांगितले आहे, तुमच्या काळात असे होत होते का? असा सवाल केला असता ‘माझ्या काळात असे काही नव्हते’ असे उत्तर चव्हाण यांनी दिले.