भाजपाचे ‘कमळ’ रद्द करा !
By Admin | Published: July 7, 2016 07:52 PM2016-07-07T19:52:26+5:302016-07-07T19:52:26+5:30
कमळ राष्ट्रीय फूल असल्याने ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह असू शकत नाही. त्यामुळे भाजपाला पक्षचिन्ह म्हणून देण्यात आलेले ‘कमळ’ रद्द करण्यात यावे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ : कमळ राष्ट्रीय फूल असल्याने ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह असू शकत नाही. त्यामुळे भाजपाला पक्षचिन्ह म्हणून देण्यात आलेले ‘कमळ’ रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
भाजपा निवडणूक लढवण्यासाठी कमळाचा वापर करून ‘एम्ब्लेम्स अॅण्ड नेम्स (प्रिव्हेन्शन आॅफ इम्प्रॉपर युझ) अॅक्ट, १९५० चे उल्लंघन करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
‘भारतीय संस्कृतीत कमळ हे पवित्र व शुभ मानले जाते. कमळ हे लक्ष्मी देवीचे फूल मानले जाते,’ असे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे. ‘कमळ हे शुद्धतेचे, यश, उदंड आयुष्याचे प्रतीक आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही,’ असे याचिकेत म्हटले आहे.
भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ रद्द करण्यात यावे, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे निवेदन केले. मात्र त्यांनी याची दखल न घेतल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे पाटील यांनी म्हटले.
२५ वर्षांपूर्वी भाजपाला निवडणूक चिन्ह म्हणून कमळ वापरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यावर कोणत्याही पक्षाने किंवा व्यक्तीने आक्षेप घेतला नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश देऊन भाजपाचे पक्षचिन्ह रद्द करण्यात यावे, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.