देवेंद्र फडणवीस, विनोद तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना
By admin | Published: October 14, 2014 04:35 PM2014-10-14T16:35:38+5:302014-10-14T16:35:38+5:30
भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप घेत देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळे या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा व हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जाहिरातींवर आक्षेप घेतला. , पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे उमेदवार असल्याने पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचे छायाचित्र वापरण्यावरही रावतेंनी आक्षेप घेतला आहे. उमेदवार असताना पक्षाच्या जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र झळकले आहे. याद्वारे मतदारसंघातील मतदारांना आकर्षित केले जात असल्याने हा खर्च उमेदवारांच्या वैयक्तिक खर्चात धरला जावा. वैयक्तिक खर्चाची मर्यादा २८ लाख असल्याने या सर्व जाहिरातींचा खर्च २८ लाखांपेक्षा जास्त होतो व त्यामुळे त्यांची उमेदवारी अपात्र ठरवावी अशी मागणी रावतेंनी केली. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केल्याचे रावतेंनी सांगितले. तर शिवसेनेनेही पराभव स्वीकारल्याने आमच्यावर आरोप केले असे प्रत्युत्तर भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिले आहे.