आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:18 AM2020-06-02T06:18:10+5:302020-06-02T06:18:19+5:30
पालकांनी याबाबत पंतप्रधान कार्यालय व एचआरडी मंत्रालयाकडे तक्रार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याच्या आयसीएसईच्या निर्णयाला एका वकिलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले.
दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा २ जुलै ते १४ जुलैदरम्यान घेण्याचा निर्णय आयसीएसई बोर्डाने काही दिवसांपूर्वीच घेतला. या निर्णयाला पालकांनी विरोध केला आहे. याबाबत बोर्डाकडे ई मेलने तक्रार केली. मात्र या मेलची बोर्डाने साधी दखलही घेतली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. व्यवसायाने वकील असलेले अरविंद तिवारी यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
पालकांनी याबाबत पंतप्रधान कार्यालय व एचआरडी मंत्रालयाकडे तक्रार केली. मात्र, आयसीएसई हे खासगी बोर्ड असल्याने आपण यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे याबाबत बोर्डाशीच चर्चा करावी, असे पंतप्रधान कार्यालयातून कळविण्यात आले. त्यामुळे न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे तिवारी यांनी याचिकेत म्हटले आहे.
मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बोर्ड विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी व लवकर निकाल लावावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास विलंब होणार नाही, त्यासाठी या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.