संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करा, ‘पत्राचाळ’ प्रकरणी ईडीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 06:22 AM2022-10-18T06:22:22+5:302022-10-18T06:22:51+5:30
आज, मंगळवारीही याबाबत ईडीकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दाखल केलेला जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी ईडीने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाला केली. प्रवीण राऊत हा संजय राऊत यांचा मोहरा होता. त्यांचा मदतनीस आणि त्यांचा विश्वासू होता, असे ईडीने म्हटले. आज, मंगळवारीही याबाबत ईडीकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.
प्रवीण राऊत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. व्यतिरिक्त अन्य कंपन्यांचाही कारभार पाहायचा. त्याने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर ३.२७ कोटी रुपये वळते केले होते. आमच्यासमोर आणखी काही नोंदी येत असून, तपास सुरू आहे, असा युक्तिवाद ईडीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी विशेष न्यायालयात केला. प्रवीण राऊत कंपनीच्या कामात सक्रिय होते आणि संजय राऊतही त्यांना मदत करत होते. पत्राचाळीच्या पुनर्विकासात संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता. ईडीने नोंदविलेल्या जबाबांवरून असे समोर आले आहे की, संजय राऊत यांना सदनिका खरेदी करण्यामध्ये स्वारस्य होते. काही लोकांनी एकत्रितपणे १३ लाख रुपये वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा केले. कारण त्यांना संजय राऊतांना नाखूश करायचे नव्हते, असा युक्तिवाद सिंग यांनी न्यायालयात केला.
भाजपला हरण्याची भीती म्हणून माघार : संजय राऊत
अंधेरी विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केले. निवडणूक हरणार असल्याचे भाजपला माहीत होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ४५ हजार मतांनी निवडणूक हरत असल्याचे समोर आले म्हणून त्यांनी माघार घेतली, असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र स्क्रिप्टेड असल्याचेही ते म्हणाले.