शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, हेच ध्येय - हबीब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 06:05 AM2019-04-07T06:05:29+5:302019-04-07T06:05:35+5:30

किसानपुत्राच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन

Cancellation of anti-farmer laws, this is the goal - Habib | शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, हेच ध्येय - हबीब

शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, हेच ध्येय - हबीब

Next

सचिन लुंगसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेकडो कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग), आवश्यक वस्तू कायदा १९५५ कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा अशा तीन कायद्यांनी तर शेतकरी वर्गाला लुटले आहे. आमची भूमिका एकच आहे; ती म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. हे आंदोलन आहे ते किसानपुत्राच्या न्याय्य हक्कांसाठी, असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.


प्रश्न : किसानपुत्र आंदोलन ही संघटना आहे का, नेमके काय आहे?
उत्तर : नाही. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही. आमच्यात कोणीच अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष नाही. किसानपुत्र आंदोलन हे शेतकरीविरोधी कायदे संपवण्यासाठी आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. कोणतीही व्यक्ती आंदोलनात सहभागी होऊ शकते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आंदोलनासाठी निधी गोळा करण्याऐवजी गरजेवेळी किसानपुत्रांनी पदरमोड करून आंदोलनाच्या गरजेएवढाच खर्च करायचा; अशी आम्ही आमच्या कामाची पद्धत ठेवली आहे.
प्रश्न : किसानपुत्र आंदोलन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?
उत्तर : उपोषण, मोर्चा, धरणे, रास्ता रोको, बंद, गर्दी गोळा करणे या गोष्टी तेवढ्या परिणामकारक राहिल्या नाहीत. परिणामी, आपणास नवे मार्ग शोधावे लागतील. लोकांची फसवणूक करून ज्यांना नेते व्हायचे आहे ते गर्दी जमवतात. आमचे काम परिवर्तनापुरते मर्यादित नाही, तर व्यवस्था हीच परिवर्तनाचे मूळ असल्याने येथे संख्येच्या तुलनेत शक्कल महत्त्वाची आहे. परिणामी, आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालेल.
प्रश्न : केवळ न्यायालयीन लढाई लढता का?
उत्तर : नाही. आम्ही केवळ न्यायालयीन लढाई लढत नाही तर, आमच्या पाच आघाड्या आहेत. या पाच आघाड्यांमध्ये न्यायालयीन आघाडी, संसदीय आघाडी, जनआंदोलन आघाडी, प्रचार आणि प्रसार आघाडी, राष्ट्रीय आघाडी व अन्नदात्यासाठी अन्नत्यागी उपवास केला जातो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे; त्या शेतकऱ्यांसाठी सहवेदना व्यक्त केली जाते.
आंदोलनाने काय केले?
उत्तर : सुरुवातीपासून विचार करायचा झाल्यास २०१५ सालापासून आम्ही कामास लागलो. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गाच्या विरोधात कायदे असतात हेच लोक ऐकण्यास किंवा मान्य करण्यास तयार नव्हते. परिणामी, हा विषय घेत राज्यभर फिरलो. कायदेविषयक परिषदा घेतल्या. पुस्तिका काढल्या. सोशल मीडियावर प्रचार आणि प्रसार केला. याचे फलित म्हणजे मोठ्या संख्येने किसानपुत्र आंदोलनाशी जोडले गेले. त्यांनी त्यांच्या परीने आंदोलनास योगदान दिले.
निवडणुकीत काय भूमिका आहे?
उत्तर : आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंधित नाही. जे उमेदवार शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशी भूमिका जाहीरपणे घेतील, अशा उमेदवारांना किसानपुत्र आंदोलनाचा नेहमीच पाठिंबा राहील.

 

जो कोणी शेतकरीविरोधी कायदे रद्द करायला काम करेल तो या आंदोलनात आहे असे आम्ही मानतो. - अमर हबीब

Web Title: Cancellation of anti-farmer laws, this is the goal - Habib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.