जन्मठेप रद्द करून सात वर्षे कारावास
By admin | Published: March 26, 2016 01:25 AM2016-03-26T01:25:28+5:302016-03-26T01:25:28+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवनमधील एका हत्या प्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द करून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवनमधील एका हत्या प्रकरणात आरोपीची जन्मठेप रद्द करून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अतुल केवलराम शेंडे (३२) असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन झोपडपट्टीतील रहिवासी आहे. २३ मे २०१३ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने त्याला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील अंशत: मंजूर केले व त्याला कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मृताचे नाव राहुल नागदिवे होते. १ आॅगस्ट २०११ रोजी आरोपी अतुल व त्याच्या भावाने जुने भांडण उकरून काढून राहुलला मारहाण केली. धारदार शस्त्राने वार केला होता. त्यात राहुल ठार झाला.