सैनिकांचा मालमत्ता कर रद्द
By admin | Published: April 17, 2017 04:01 AM2017-04-17T04:01:54+5:302017-04-17T04:01:54+5:30
सैनिकांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे
मुंबई : सैनिकांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. त्यानुसार, सुरक्षा दलातील शौर्य पदकप्राप्त सैनिक आणि सैनिकांच्या विधवांना यापुढे मालमत्ता कर भरावा लागणार नाही. पालिकेच्या कायद्यात तरतूद नसल्याने ही मागणी पूर्ण करता येत नव्हती.
ही तरतूद करण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्तावही पाठवला होता. मात्र, राज्य सरकारने २०१२ मध्ये या प्रस्तावाल मंजुरी दिली नाही. जुलै २०१६ मध्ये शौर्य पदकप्राप्त सैनिक आणि सैनिकांच्या विधवांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा कर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार, पालिकेनेही हा कर माफ करण्याचा प्रस्ताव विधी समितीपुढे मांडला आहे. हा ठराव विधी समितीपाठोपाठ स्थायी समिती आणि महासभेत मंजूर झाल्यानंतर, सैनिकांचा मालमत्ता कर रद्द होणार आहे. (प्रतिनिधी)
काय करावे लागेल
मालमत्ता कर माफ करण्यासाठी दरवर्षी अर्ज करावा लागेल
सरकार मान्य जिल्हा सैनिक बोर्डाचा सदस्य असल्याचा दाखला आवश्यक
शौर्य पदक प्राप्त सैनिकांच्या अथवा विधवांच्या नावावर
मालमत्ता असल्यास करात सूट मिळणार
अर्जात खोटे पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे
10935 शौर्य पदकप्राप्त मुंबईत सैनिक आहेत.
9196 सैनिकांच्या विधवा आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून महापालिकेला दिली आहे.