मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:30 PM2024-08-20T12:30:51+5:302024-08-20T12:31:30+5:30

मॉरिशस, एनसीआय-नागपूर यांच्यात करार

Cancer patients from Mauritius are now being treated in Nagpur | मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार होणार

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार होणार

मुंबई : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात सोमवारी मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानुसार मॉरिशसमधील कर्करुग्णांवरील उपचारात आता नागपूरचा सहभाग असेल. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री ॲलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

त्यानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांवर नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उपचार केले जातील. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील रुग्णालयांमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी, परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाईल. या सामंजस्य कराराच्या वेळी मॉरिशसचे कौन्सिल जनरल अरविंद बख्तावार, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक उपस्थित होते. 

मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारतर्फे जाहीर ८ कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्याच्या सोहळ्यासाठी मॉरिशसचे केंद्रीय मंत्री ॲलन गानू हे हिवाळी अधिवेशनादरम्यान, नागपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली. तेथील अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पाहून ते भारावून गेले. त्यावेळी असा सामंजस्य करार करण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते आणि त्यातूनच आजचा दिवस साकारला.

या सामंजस्य करारानंतर मंत्री ॲलन गानू म्हणाले की, या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसचे संबंध आणखी सुदृढ होतील. आमच्या देशात १८ वर्षांपर्यंतच्या कर्करोग रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. अलीकडेच ती वयोमर्यादा वाढवून २५ करण्यात आली आहे. या करारामुळे मॉरिशसमधील रुग्णांना सुद्धा आता चांगल्या आरोग्यसुविधा प्राप्त होणार आहेत. हा करार फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याचा विशेष आनंद आहे. 

महाराष्ट्र-मॉरिशसच्या संबंधात नवा आयाम
 फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने कायमच स्वत: समृद्ध होताना जगाला मदतीचा हात देऊ केला आहे. ॲलन गानू हे तर आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. 
 मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणासाठी मॉरिशसला गेलो होते. आपली मराठी परंपरा तेथे इतक्या चांगल्याप्रकारे जपली जाते, याचा मला विशेष आनंद झाला. 
 या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसच्या संबंधात नागपूरचा आणखी एक नवा आयाम जोडला जाणार आहे. 

Web Title: Cancer patients from Mauritius are now being treated in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.