कर्करुग्णांना मिळणार मोफत आॅनलाइन सल्ला
By admin | Published: June 10, 2015 04:20 AM2015-06-10T04:20:14+5:302015-06-10T04:20:14+5:30
टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर गोरगरीब रुग्णांना आॅनलाइन मोफत सेकंड ओपीनियन देणार आहेत.
मुंबई : कर्करोगाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात. शस्त्रक्रिया करावी की नाही, कोणत्या पद्धतीने उपचार घ्यावेत, याविषयी सेकंड ओपीनियन घेण्यासाठी अनेक रुग्ण परळच्या टाटा रुग्णालयात येतात. पण यापुढे रुग्णांना रुग्णालयात येऊन सेकंड ओपीनियन घ्यायची आवश्यकता नाही. कारण टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर गोरगरीब रुग्णांना आॅनलाइन मोफत सेकंड ओपीनियन देणार आहेत.
भारतात मुखाच्या आणि स्तनाच्या कर्करुग्णांचे प्रमाण जास्त आहे. उपचार घेताना कर्करुग्णांना शारीरिक त्रास होतात. यामुळे अनेक जण एका ठिकाणी उपचार घेत असताना दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतात, पण हा सल्ला घेण्यासाठी त्यांना पैसे खर्च करून लांब प्रवास करीत यावे लागते. यामुळे रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाइकांना त्रास होतो. टाटा रुग्णालय हे कर्करोग उपचारासाठी टर्शरी केअर सेंटर म्हणून ओळख आहे. यामुळे येथे अनेक ठिकाणाहून रुग्ण येत असतात. रुग्णांना त्यांच्या घराजवळच उपचार मिळावेत, अशी आमची इच्छा आहे. पण काही वेळा रुग्णांच्या घराजवळ चांगले उपचार अथवा तज्ज्ञ डॉक्टर नसतात. यामुळे त्यांना शहराकडे यावे लागते. रुग्णांचा त्रास कमी व्हावा आणि रुग्णालयाचा भार कमी व्हावा, यासाठीच आॅनलाइन सल्ला देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. प्राथमिक पातळीवर स्तनाच्या कर्करोगाचा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. कर्करोग रुग्णांसाठी ही सेवा टाटा रुग्णालय आणि नाव्या नेटवर्क संयुक्त विद्यमाने देत आहेत. संकेतस्थळावर रुग्णाची संपूर्ण माहिती आणि आजाराविषयीची माहिती भरायची आहे. त्याचबरोबरीने इतर सर्व कागदपत्रे भरायची आहेत. (प्रतिनिधी)