एमपीएससीच्या कमी जागांमुळे परीक्षार्थी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:57 AM2018-02-13T01:57:04+5:302018-02-13T01:57:22+5:30
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांच्या मोर्चांना राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २९ डिसेंबर रोजी दिलेल्या जाहिरातीत केवळ ६९ जागा आहेत.
- राम शिनगारे
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांच्या मोर्चांना राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २९ डिसेंबर रोजी दिलेल्या जाहिरातीत केवळ ६९ जागा आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीतही अत्यल्प जागा आहेत. या कारणांमुळे परीक्षांची तयारी करणाºया युवकांमध्ये कमालीचा असंतोष आहे.
औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवकांनी ६ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. या मोर्चानंतर बीड, नांदेड, नागपूर, यवतमाळ, पुणे, कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये मोर्चे निघाले आहेत. परीक्षांच्या वेळापत्रकांचे काटेकोर पालन, सुसूत्रता, पारदर्शकता, पदांची निश्चित संख्या अशा या युवकांच्या मागण्या आहेत. तसेच तलाठी, पोलीस, शिक्षक, लिपिक यासारख्या पदांची भरती जिल्हास्तरावरील अधिकाºयांमार्फत न करता त्यासाठी राज्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
आता मुंबईतही मोर्चा
आतापर्यंतच्या मोर्चांची राज्य सरकारने दखल न घेतल्यास लवकरच मुंबईतही विराट मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती औरंगाबादेतील पहिल्या मोर्चाचे संयोजक बाळासाहेब सानप यांनी दिली.