अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात मेणबत्ती मोर्चा
By admin | Published: November 8, 2016 02:18 AM2016-11-08T02:18:30+5:302016-11-08T02:18:30+5:30
वृत्तवाहिनीवरील बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. सरकारची दडपशाही आहे. प्रबोधनाचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ करत असतो
ठाणे : वृत्तवाहिनीवरील बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. सरकारची दडपशाही आहे. प्रबोधनाचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ करत असतो. त्यांनी कसे वागावे अथवा वागू नये ते सरकारला ठरवता येणार नाही. पत्रकारांना शांत बसवण्याची पद्धत १९३२ साली हिटलरने अवलंबली होती. आणीबाणीतही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशीच गळचेपी झाली होती. हे केंद्रातील भाजपा सरकारने लक्षात घ्यावे. सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर जनता यांनाही धडा शिकवेल, असा सूर सोमवारी ठाण्यात काढलेल्या मेणबत्ती मोर्चाद्वारे व्यक्त झाला. हा मोर्चा सुरू असतानाच वृत्तवाहिनीवरील बंदी मागे घेतल्याचे वृत्त समजले.
एका वृत्तवाहिनीवर आणलेल्या बंदीच्या निषेधार्थ सोमवारी ठाण्यातील नागरिकांनी एकत्र येत गडकरी रंगायतन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर मेणबत्ती मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले. हातात मेणबत्त्या घेऊन आणि हाताला काळ्या फिती बांधून ठाणेकरांनी निषेध नोंदवला. डोन्ट किल फ्रीडम आॅफ स्पीच, डोन्ट किल फ्रीडम आॅफ एक्सप्रेशन, डोन्ट किल इंडियन कॉन्स्टिट्युशन असे घोषफलक या मार्चमध्ये पाहायला मिळाले. यावेळी निवृत्त न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, डॉ.राम माळी, ऋता आव्हाड, डॉ.अभिजीत वैद्य, आनंद परांजपे, नगरसेवक संजय भोईर, सुहास देसाई, अमित सरैय्या तसेच शानू पठाण, उपस्थित होते. (प्रतिनिधी)