उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 01:46 PM2017-02-16T13:46:13+5:302017-02-16T13:46:13+5:30
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे.
उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकता
फ्लेक्सकडे लक्ष
अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय चांगला ठरणारा आहे. राजकीय पक्षाने किती उमेदवार दिले ही माहिती सहजतेने उपलब्ध होईल. मात्र प्रतीज्ञा पत्रात उमेदवारांनी जाहीर केलेली स्थावर व जंगम मालमत्ता किती? याकडे मतदारांची उत्सुकता लागली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवारांना मालमत्तेची माहिती प्रतीज्ञा पत्राद्वारे अनिवार्य केलीे आहे. यात उमेदवारांकडे किती ‘लक्ष्मी’ आहे, हे जाहीर होणार आहे. याच ३ बाय ४ फूट आकार असलेल्या फ्लेक्सच्या आधारे रिंगणातील उमेदवार आमने- सामने येणार आहेत. प्रचारात स्थावर व जंगम मालमत्तेचा मुद्दा उपस्थित करुन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होणार आहे. आयोगाने नियम व कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रियेला वळण लावले आहे. अलिकडे राबविली जाणारी आदर्श आचार संहिता ही भयमुक्त निवडणुकांसाठी लाभदायक ठरणारी आहे. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची संपत्ती प्रतीज्ञा पत्राच्या आधारे जाहीर करण्याचा निर्णय मतदारांसाठी जनजागृती करणारा आहे. गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आणून लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राजकीय पक्ष अथवा आघाड्या उमेदवारी देताना वेगळे निकष लावते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचा राजकारणात सहजतेने प्रवेश होते. मात्र आयोगाने राबविलेली ही संकल्पना निश्चित बदल करणारी ठरेल. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार कोण उमेदवार रिंगणात हे स्पष्ट झाले आहे. गडगंज घरातील व्यक्तींचेही राजकारणाच्या दिशेने पावले पडू लागली आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रतीज्ञा पत्रात जाहीर केलेल्या संपत्तीची विवरणपत्रे पाहिले तर स्थावर व जंगल मालमत्तेबाबत अनेक बाबी स्पष्ट होतील. सदृढ लोकशाहीसाठी चांगल्या प्रतिमेच्या उमेदवार असणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेला उमेदवार नको, असे अभिप्रेत आहे. मात्र अमूक पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसरा पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्यांना उमेदवारी बहाल करतात, असे चित्र आहे. ही बाब समाजसाठी घातक ठरणारी आहे.
दौलतजाद्यांचा उमेदवारीत समावेश
४उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रानुसार बहुतांश राजकीय पक्षांनी समाजसेवेला महत्व दिले नसून गडगंज संपत्ती असलेल्यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे समाजसेवेचे व्रत बांधून दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाहीच? असा संदेश राजकीय पक्षाने दिला आहे. राजकीय पक्षाचे निकष व नियमावलीचे ‘पडद्याआड’ पालन करणाऱ्यांना उमेदवारी मिळाली आहे.