काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखतीला मराठी भाषेतील लेखी परिक्षेची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:14 PM2017-07-23T18:14:13+5:302017-07-23T18:14:13+5:30
श्रावण मासारंभाच्या पहिल्याच दिवशी मुलाखती पार पडणार
राजू काळे
ऑनलाईन लोकमत
भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसमधुन यंदाची पालिका निवडणुक लढविण्यासाठी २३८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांच्या मुलाखती श्रावण मासारंभातील पहिल्या सोमवारी पार पडणार आहेत. मुलाखतीपुर्वी इच्छुकांना २०० मार्कांची मराठी भाषेतील लेखी परिक्षा मात्र द्यावी लागणार असल्याने धर्मनिरपेक्ष काँग्रेसने मराठी भाषेचा पुरस्कार केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत अभ्यासू उमेदवारांना उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध निर्णय घेतले जात असुन त्यात महत्वाचा म्हणजे लेखी परिक्षा इच्छुकांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. काँग्रेसला लागलेली गळती स्थानिक नेतृत्व मुझफ्फर हुसेन यांच्या प्रयत्नामुळे रोखण्यात आली असली तरी सेना-भाजपात वाढलेल्या गर्दीला काँग्रेसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेतील किंगमेकर ठरणार असल्याचा दावा केला जात असला तरी अधिकाधिक जागेवर काँग्रेस उमेदवार निवडुन यावेत, यासाठी पक्षबांधणीची व्यूहरचना आखली जात आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमधील २३८ इच्छुकांनी उमेदवारीवर दावा केला असुन त्यांच्या मुलाखतीचे सोपस्कार सोमवारी सकाळी १० वाजल्यापासुन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उरकले जाणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना पुर्ण तयारीनिशी मुलाखतीला उपस्थित रहावे लागणार असले तरी त्यांना स्थानिक प्रशासकीय कारभारासह सामान्य ज्ञानाच्या अभ्यासाची सुद्धा तयारी करावी लागणार आहे. कारण यंदा काँग्रेसने मराठी भाषेतील लेखी परिक्षेचे आयोजन केले असुन ती सर्व इच्छुकांना बंधनकारक करण्यात आली आहे. हि परिक्षा २०० मार्कांची असुन त्यात एकुण १६ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे. पहिले १४ प्रश्न आॅब्जेक्टिव्ह पद्धतीचे तर उर्वरीत २ प्रश्न विविध विषयांवर आधारीत असणार आहे. २ प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या दहा मुद्यांवर लिहावी लागणार आहेत. हि परिक्षा मीरारोड येथील अस्मिता क्लबमध्ये पार पडणार असुन त्याचे नियोजन प्रभागनिहाय करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना मुलाखतीपुर्वी लेखी परिक्षेची सीमा पार करावी लागणार आहे. परिक्षेसाठी १० मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना वेगवेगळे प्रश्नांचा समावेश असलेल्या प्रश्नपत्रिका दिल्या जाणार असुन परिक्षेनंतरच त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. परिक्षेची उत्तपत्रिका तपासण्यासाठी अराजकीय परंतु, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. यानंतर पार पडणाय््राा मुलाखतीसाठी माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस मुझफ्फर हुसेन यांच्यासह प्रदेश निरीक्षक राजेश शर्मा, मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, विविध सेलचे अध्यक्ष व प्रदेश पदाधिकाय््राांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मुलाखतीसह परिक्षेचा अहवाल थेट प्रदेश कमिटीला पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फतच उमेदवारांची यादी जाहिर केली जाणार असल्याचे पक्षाच्या सुत्राकडुन सांगण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अनिल सावंत : यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सर्व जाती समावेशक धोरण अंमलात आणीत असुन उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे, यासाठी पहिल्यांदाच मराठी भाषेवर आधारीत लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवार निवडीचा अधिकार प्रदेश कमिटीला देण्यात आल्याने उमेदवार निवड प्रक्रीयेत पारदर्शकता राहणार आहे.