चलनतुटवड्याने केली इच्छुक उमेदवारांची ‘कोंडी’

By admin | Published: January 16, 2017 03:47 AM2017-01-16T03:47:14+5:302017-01-16T03:47:14+5:30

चलन तुटवड्यामुळे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्वच पक्षांतील उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली

Candidates wishing to convert money into 'Kondi' | चलनतुटवड्याने केली इच्छुक उमेदवारांची ‘कोंडी’

चलनतुटवड्याने केली इच्छुक उमेदवारांची ‘कोंडी’

Next

जितेंद्र कालेकर,

ठाणे- चलनतुटवड्यामुळे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्वच पक्षांतील उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. दारात वेगवेगळ्या कारणांसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसह सार्वजनिक मंडळांना मोकळ्या हाताने पाठवण्याची नामुश्की अनेकांवर आल्याचे हे कथित इच्छुक आता खासगीत बोलत आहेत.
नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांवर बंदी आणून पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. त्यानंतर बँकेतून पैसे काढण्यालाही अनेक निर्बंध लावले आहेत. काही बँकांमध्ये आठवड्यातून एकदाच २४ हजारांची रोकड काढता येते. एटीएममधूनही दिवसाला कधी चार, तर कधी साडेचार हजार रुपये काढण्याचे सांगण्यात येते. त्यातही बँकेतून दोन हजारांच्या नोटाच अधिक प्रमाणात वितरित केल्या जात आहेत. त्यापाठोपाठ पाचशेच्या नोटा दिल्या जातात. शंभराच्या नोटांचे वितरण अगदी अल्प प्रमाणात असल्यामुळे मार्केटमध्ये शंभर आणि पाचशेच्या नोटांचा अजूनही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. याच चलनतुटवड्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे पैशांअभावी मोठी दमछाक होत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी एका सार्वजनिक मित्र मंडळाला पाचशे ते दोन हजारांच्या रकमांचे आश्वासन देऊन तशा पावत्याही फाडल्या; पण साईबाबांच्या पालखीला पायी जाणारी मंडळी, सार्वजनिक सत्यनारायण पूजा, क्रिकेट सामने तसेच वैद्यकीय मदतीसाठी येणारे रुग्ण यासह परिसरातील मित्र मंडळांना लागणारी तातडीची मदत देण्याला या सर्वच इच्छुकांसह बड्या नेत्यांनाही अडचणी निर्माण झाल्याचे अनेक जण सांगतात.
एरव्ही, निवडणुका आल्यानंतर रोकड किंवा वेगवेगळ्या रूपाने मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चांगलीच ‘कोंडी’ झाली आहे. यासंदर्भात अधिकृतपणे बोलायला कोणी तयार नसले तरी खासगीत या निर्णयाने सर्वांचीच पंचाईत झाल्याचे अनेक नेते तसेच तथाकथित इच्छुकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>रोख रकमा उचलून देता येत नसल्याने, अडीनडीला कार्यकर्त्यांच्या हाती खणखणाट नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.

Web Title: Candidates wishing to convert money into 'Kondi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.