नरभक्षकांचा बंदिवास संपला
By admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:28+5:302015-12-05T09:07:28+5:30
राज्यात नरभक्षक म्हणून नोंद असलेले वाघ, बिबटे व इतर वन्यपशु बंदिस्त असून त्यांचा कारावास संपविण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक
- गणेश वासनिक, अमरावती
राज्यात नरभक्षक म्हणून नोंद असलेले वाघ, बिबटे व इतर वन्यपशु बंदिस्त असून त्यांचा कारावास संपविण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. नागपूर येथील गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक वन्यपशुंना पाठविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे काही वर्षांपासून कोठडीत कैद असलेल्या नरभक्षक वन्यपशुंचा कारावास संपून आता त्यांची बंदीगृहातून सुधारगृहाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
राज्यभरात वनविभागाच्या कोठडीत कैद असलेल्या नरभक्षक वाघ, बिबटे, चितळ, अस्वल आदी वन्यपशुंना सुरक्षितस्थळी हलविण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी घेतला आहे. त्यानुसार ११ मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून नरभक्षक वन्यपशुंना नागपूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोरेवाडा प्रकल्पात पुनर्वसनासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली भागात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्यांना रेस्क्यू आॅपरेशनद्वारे वनविभागाच्या कोठडीत कैद करण्यात आले होते, असे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी सांगितले.
अमरावतीमधील वडाळीच्या वनकोठडीत राजा व शेरा हे दोन नरभक्षक बिबटे आठ वर्षांपासून बंदिस्त आहेत. त्यांनाही गोरेवाडा प्रकल्पात पाठविले जाणार आहे. गोरेवाडा प्रकल्पात नरभक्षक वन्यपशुंचे नियोजन, नियंत्रणाची जबाबदारी वनविकास मंडळांकडे सोपविण्यात आली आहे. नरभक्षक वन्यपशुंना गोरेवाडा प्रकल्पात आणल्यानंतर त्यांच्या प्रजननवाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी वनविकास मंडळावर सोपविण्यात आली आहे.