नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद
By admin | Published: November 23, 2015 02:04 AM2015-11-23T02:04:26+5:302015-11-23T02:04:26+5:30
महिनाभरापासून कसाऱ्यासह आसपासच्या पाड्यांत धुमाकूळ घालणारा बिबट्या रविवारी सकाळी वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला.
कसारा : महिनाभरापासून कसाऱ्यासह आसपासच्या पाड्यांत धुमाकूळ घालणारा बिबट्या रविवारी सकाळी वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला.
कसारा परिसरातील कामडीपाडा येथून अडीच वर्षांच्या दीपाली भगत या चिमुरडीला आपले भक्ष्य बनविल्यानंतर काही दिवसांनी पेढ्याचापाडा येथे रात्रीच्या वेळी घराबाहेर आलेल्या तरुणीवर हल्ला चढवून तिला आपले भक्ष्य करू पाहणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले.
पेढ्याचापाडा येथील रंगी धापटे या तरुणीवर हल्ला झाल्यानंतर वन विभागाने येथे बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यासाठी अनेक कर्मचारी, रेक्स्यू टीम गेल्या १५ दिवसांपासून कार्यरत होत्या. रविवारी सकाळी ६च्या सुमारास बिबट्या भक्ष्य घेण्यासाठी पिंजऱ्यात घुसला अन् जेरबंद
झाला. बिबट्याला पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास
सोडला.
कसारा वन विभागाचे अधिकारी म्हस्के, वाशला वनाधिकारी बागराव यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. (वार्ताहर)