कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:12 AM2022-08-15T05:12:36+5:302022-08-15T06:51:44+5:30

Eknath Shinde : सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Can't a worker become Chief Minister? Question by Eknath Shinde | कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल

कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल

Next

ठाणे  : कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तोच मुख्यमंत्री होणार का? सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?, असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. ठाण्यातील नागरिकांतर्फे शनिवारी रात्री डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून हा सवाल उपस्थित केला.

सध्या राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढविल्या जातील, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील अडीच वर्षांपासून शिवसेना अडचणीत होती; मात्र आता अडचणीत आलेली शिवसेना आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे येत्या अडीच वर्षांत एकाही शिवसैनिकाच्या केसाला हात लावणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या राज्यात कोणालाही वेडेवाकडे  बोलता येणार नाही. हिंदू देवदेवतांबदल चुकीचे बोलू नये, असा सूचनावजा इशाराही त्यांनी 
यावेळी दिला. 

आरे कारशेड झाले नाही, तर प्रकल्प तीन ते चार वर्षे लांबणीवर पडल्याने त्याचा खर्चही वाढणार आहे. मात्र, त्यात आता येथील एकही वृक्ष तोडला जाणार नाही. जे तुम्हाला जमले ते अजित पवारांना का जमले नाही? असा सवाल त्यांना केला असता, पवार यांनी प्रयत्न केला होता. मात्र त्यांना ते शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगत, आम्ही घड्याळ बघून काम करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

‘मुंबई वेगळी करू शकणार नाही’
पुढील अडीच वर्षांत मुंबईतील रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. त्यामुळे प्रवास सुखकारक होईल. ठाणेही खड्डे आणि वाहतूककोंडीमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच वेगळी करू शकत नाही, फक्त काहीजण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

७५ रिक्षा, दुचाकींसह स्वागतयात्रा 
व्यासपीठावर शिंदे यांचा आजवरचा राजकीय जीवनप्रवास प्रतिकृतींद्वारे रेखाटण्यात आला. त्यात किसननगर शाखेपासून ठाणे महापालिका ते मंत्रालयाची बोलकी प्रतिकृती उभारली होती. ७५ रिक्षा आणि ७५ दुचाकींची स्वागतयात्रा शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानापासून नितीन सिग्नल, कॅडबरी सिग्नल, वर्तकनगर सिग्नल, शिवाईनगर सिग्नल, गांधीनगर सिग्नल, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहापर्यंत काढण्यात आली.

शेवटच्या घटकाची कामे होवोत : काडसिद्धेश्वर स्वामी 
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही शिंदे हे मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. एखाद्या खेड्यातील व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री होतेय, हेच भारतीय लोकशाहीचे बळ आहे. शिंदे हे संवेदनशील आहेत. 
काहीच न बोलता ते काम करतात. त्यांच्या हातून समाजातील शेवटच्या घटकाची कामे होवोत आणि सर्वच घटक त्यांच्या कार्याने सुखावतील, असा विश्वास कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी कार्यक्रमात व्यक्त केला. 
अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत असतात. या कामाच्या तपश्चर्येतून सिद्धी प्राप्त होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या परिश्रमाचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव होतो. अशाच प्रकारे शिंदे यांचा इथे गौरव होत आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Can't a worker become Chief Minister? Question by Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.