मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 05:56 AM2016-09-21T05:56:50+5:302016-09-21T05:56:50+5:30
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी ३ हजार २१५ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास आज सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली.
मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी ३ हजार २१५ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चास आज सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली.
या अंतर्गत खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) या १२ किलोमीटरमध्ये दोन बोगदे आणि दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. खालापूर फूडमॉल ते खोपोली इंटरचेंज दरम्यान आठ पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हा द्रुतगती मार्ग एकूण ९५ किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी आहे. त्यातील खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानच्या १२ किमी लांबीचे काम हा द्रुतगती मार्ग बांधताना पर्यावरणविषयक बाबींमुळे हाती घेण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहतूककोंडी होत असे. ती फोडण्यासाठी आता या दरम्यान दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. या कामांना पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत ३० नोव्हेंबर २०१५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करून तो समितीसमोर पुन्हा सादर करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)