विषम परिस्थितीवर मात करण्याची महिलांमध्ये क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:37 AM2017-11-17T01:37:38+5:302017-11-17T01:37:53+5:30
सध्या तंत्रज्ञान आणि समाजावर होणाºया बदलांचा परिणाम व्यवसायावर आणि त्याच्या कल्पकतेवर होत आहे. महिला उद्योजिकांमध्ये व्यवसायाचे कौशल्य असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या तंत्रज्ञान आणि समाजावर होणाºया बदलांचा परिणाम व्यवसायावर आणि त्याच्या कल्पकतेवर होत आहे. महिला उद्योजिकांमध्ये व्यवसायाचे कौशल्य असते. त्यांनी बाहेरील मदतीची वाट न पाहता स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याने उद्योगाचा विकास करावा, असा सूर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी येथे काढला.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) महिला विंगतर्फे उद्योग भवन, सिव्हिल लाईन्स येथील व्हीआयएच्या सभागृहात ‘महिला उद्योजिका व २०३० : भविष्यात तयारीची मूळ स्थिती’ आणि ‘महिला उद्योजिकांची स्थिती, सहकार्य व यश’ या विषयांवर दोन कार्यशाळांचे आयोजन गुरुवारी करण्यात आले.
पहिल्या कार्यशाळेत व्हीआयए अॅग्रो व फूड प्रोसेसिंग फोरमचे चेअरमन व रास फ्रोजन फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अरुण खोब्रागडे यांनी तर दुसºया कार्यशाळेत इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) प्रा. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग आणि डॉ. अभिषेक सिंग यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा साची मलिक यांनी केले. संचालक सहसचिव रश्मी कुळकर्णी यांनी तर सचिव रिता लांजेवार यांनी आभार मानले. यावेळी व्हीआयएचे कोषाध्यक्ष गिरीश देवधर, महिला विंगच्या माजी अध्यक्षा व सल्लगार सरला कामदार यांच्यासह महिला उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
व्यवसायात विशिष्टता आणावी : अरुण खोब्रागडे
अरुण खोब्रागडे म्हणाले, दुसरा करतो म्हणून मी करतो, हे चुकीचे आहे. व्यवसायात विशिष्टता आणावी लागेल. पूर्वी व्यवसाय करताना बाजारपेठेची निवड करावी लागायची, पण आता बाजारपेठ मोबाईलवर गेली आहे. शेजारच्या दुकानाची तुलना आता तुम्हाला करता येणार नाही. व्यवसायात विशिष्टता ठेवणे गरजेचे झाले आहे. व्यवसाय वाढीसाठी अॅमेझॉनने हेच केले. नागपूरचे उदाहारण द्यायचे झाल्यास संतोष पकोडेवाला आणि कस्तूरचंद पार्क येथील पोहेवाल्याने व्यवसायात विशिष्टता (युनिकनेस) आणल्यामुळे शहराच्या कानाकोपºयातील ग्राहक त्यांच्याकडे येतात. त्यामुळेच त्यांच्या व्यवसायाने तग धरला आहे. असे व्यवसाय दीर्घकाळ टिकतात, असे अरुण खोब्रागडे म्हणाले.
स्वत:ची ओळख निर्माण करा : डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग
महिला उद्योजिकेला स्वत:ची ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. व्यवसाय तुम्ही स्व:खुशीने करता वा नाईलाजाने करता आहात, हे प्रारंभी पाहावे. यश मिळाले नाही तर दु:खी होता. तुम्ही जे काम करीत आहात, त्याचे नियंत्रण कुठे आहे, हे तपासून पाहावे. बाहेरून पाठिंबा घेण्याची गरज नाही, ते उद्योजिकेत असतेच. परिश्रमाने स्वत:ची ओळख निर्माण करा, असा सल्ला इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) प्रा. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग यांनी दिला.
आव्हानांवर मात करा : डॉ. अभिषेक सिंग
शिक्षित पण रोजगारापासून अनेक वर्षे दूर असलेल्या महिलांना शासकीय योजनांची माहिती नसते आणि ते कुणीही सांगत नाही. उद्योग सुरू केलेल्या १०० पैकी ९० महिलांना पाठिंबा नसतो. त्यावर संशोधन केले आहे. तणाव हे मुख्य कारण आहे. महिलांना अनेक बंधने आणि आव्हाने असतात. त्यावर मात करून व्यवसाय करा, पैसा मिळवा, असे आवाहन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचे (आयएमटी) प्रा. डॉ. अभिषेक सिंग यांनी केले. त्यांनी दंगल चित्रपटातील कुस्तीचा संदर्भ आणि चीनमधील अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांच्या प्रगतीची माहिती दिली.