विधानभवनातून
By Admin | Published: March 8, 2017 01:26 AM2017-03-08T01:26:10+5:302017-03-08T01:26:10+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पारदर्शकता हा शब्द फारच ऐरणीवर आणला होता. आता त्याचे पडसाद साहजिकच विधानसभेतही उमटत आहेत.
चर्चा पारदर्शकतेची
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पारदर्शकता हा शब्द फारच ऐरणीवर आणला होता. आता त्याचे पडसाद साहजिकच विधानसभेतही उमटत आहेत. ‘मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभाराची हमी दिलीच आहे तर मग मुंबईतील रस्ते घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार का’असा सवाल करीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारदर्शकतेचा विषय छेडला. शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांनी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर घोटाळ्यांचे आरोप करताना आता पारदर्शक चौकशी होऊनच जाऊ द्या, असे आव्हान गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना दिले. काँग्रेसचे नसीम खान यांनी, वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा बाहेर काढताना पारदर्शक चौकशीची मागणी केली. एकूणच अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्याच दिवशी पारदर्शकता हा परवलीचा शब्द ठरला.
लक्षवेधी सभात्याग
विधानसभेच्या आजच्या कामकाजात पाच लक्षवेधी सूचना होत्या. मात्र, त्यापैकी चारची उत्तरेच आलेली नसल्याने सगळ्याच लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्याचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील ही संधी कशी सोडणार? त्यांनी तत्काळ सत्तापक्षावर हल्लाबोल केला. मंत्र्यांच्या या हलगर्जीपणाबद्दल त्यांना समज द्या, असा प्रकार होता कामा नये, असे ते म्हणाले. कामकाजाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत मग विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. मंत्र्यांकडून वेळेत उत्तरे न आल्याने लक्षवेधी पुढे ढकलाव्या लागत आहेत. ही गंभीर बाब आहे. यापुढे असे होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश आपण आजच मंत्री कार्यालयांना दिलेले आहेत,असे अध्यक्ष बागडे यांनी सांगितले.
मुनगंटीवार-पाटील खडाजंगी
भ्रूण हत्येच्या मुद्यावर सरकारतर्फे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. त्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की, ‘पंकजा मुंडे, दीपक सावंत हे संबंधित मंत्री सभागृहात असताना वित्तमंत्री का उत्तर देत आहेत. त्यांचे काम अर्थसंकल्प मांडण्याचे आहे. त्यावर, तुमच्याही काळात तसे घडत होते, सरकारची सामूहिक जबाबदारी म्हणून मी उत्तर दिलेले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. ‘ज्येष्ठ मंत्री म्हणून उत्तर देण्याचा त्यांना अधिकार आहे’ अशी मुनगंटीवार यांची पाठराखण अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली आणि वादावर पडदा टाकला.मात्र, या निमित्ताने आजी-माजी वित्तमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.
सोलापूरची किनार
सोलापूरचे भाजपा समर्थित अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल काढलेल्या उद्गारावरुन विधान परिषदेचे कामकाज बंद पडले. सोलापूर महापालिकेत बहुमत आणि जिल्हा परिषदेत चांगले यश मिळूनही भाजपाचे मंत्री, आमदार परिचारक प्रकरणावरून अस्वस्थ आहेत. परिचारकांनी माफी मागितली तरी वाद पेटता ठेवला जात असल्याची भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली असल्याचे समजते. आता मुख्यमंत्री सभागृहात काय भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे.
- फिरस्ता