आर्थिक मंदीतही यंदा मकरसंक्रांत होणार गोड; रेडिमेड तीळगुळाला महिलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:02 AM2020-01-14T00:02:18+5:302020-01-14T00:02:52+5:30
साहित्याच्या किमतीत घट, तिळाच्या लाडवांचा खर्च तुलनेने कमी
सुनिल घरत
पारोळ : वाढत्या महागाईबरोबरच आर्थिक मंदीची झळ बसलेली असताना यंदाची मकरसंक्रांत मात्र गोड ठरणार आहे. किरकोळ बाजारात तिळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० रुपयांनी घट झाली असून खोबरे, शेंगदाणे आणि गुळाच्या किमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा तिळाच्या लाडवांचा खर्च तुलनेने कमी असेल. त्यातही वसईतील बहुतांश गृहिणींनी रेडीमेड तिळगुळांना मोठ्या प्रमाणात मागणी केल्याचे दिसून येते.
यंदाच्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी मालाचे दर काही महिन्यांपासून चढेच आहेत. भाज्यांसह सारेच महागल्याने यंदा तिळाचे लाडू बनविण्यासाठी लागणारे जिन्नसही तसेच महाग असतील, अशी शक्यता व्यापारी सुरुवातीला व्यक्त करत होते. देशांतर्गत तिळाचे उत्पादन कमी झाले असले तरी, परदेशातून पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन - चार महिन्यांच्या तुलनेत तिळाचे दर वाढले आहेत. मात्र, हे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात २२० रुपये किलोने मिळणाऱ्या तिळाच्या किमतीत या वर्षी ४० रुपयांची घसरण झाली असून तीळ १८० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे. तिळाखेरीज तिळगुळातील अन्य जिन्नसही गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त झाले आहेत. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात २४० रुपये किलोने विकल्या जाणाºया खोबºयाच्या किमतीत ६० रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात १८० रुपये किलो या दराने खोबरे विकले जात आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १३० रुपये किलोने विकले जाणारे शेंगदाणे सध्या १२० रुपये किलोने विकले जात आहेत.
बंदी असतानाही पतंगाचा मांजा चिनीच?
मकरसंक्रांतीचा सण म्हटला म्हणजे डोळ्यांसमोर येतो तो पतंगोत्सव. या पतंगोत्सवाला रंगत चढते ती पतंग काटाकाटीची. यासाठी खास चिनी मांजा वापरला जातो. हा मांजा लवकर तुटत नाही. मात्र, या मांज्यामुळे पक्ष्यांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना काही वर्षांपासून घडत आहेत. अनेक अपघातही झाले आहेत.
चिनी मांजा वापरावर कायद्याने बंदी असतानाही पतंगासाठी सर्रास चिनी मांजाच वापरला जात असल्याचे दिसून येते. सध्या वसईत दुकाने, बाजारपेठांत विविध रंगाचे लहान-मोठ्या आकाराचे पतंग विक्रीसाठी आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी गर्दी करू लागले आहेत.