अडीच कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत
By admin | Published: March 10, 2017 02:15 AM2017-03-10T02:15:15+5:302017-03-10T02:15:15+5:30
ताडदेव आणि अॅण्टॉपहील येथून पोलिसांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या अडीच कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : ताडदेव आणि अॅण्टॉपहील येथून पोलिसांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या अडीच कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
ताडदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांना दोन तरुण चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी हाजीअली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्या नेतृत्वाखाली ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी रात्री उशिराने कारमधून संशयास्पद उतरत असलेल्या दोघांच्या कारमधून त्यांनी तब्बल १ कोटी ६० लाखाच्या जुन्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी मालाडचा रहिवासी असलेला व्यापारी सायर लाखाजी माली याच्यासह इस्टेट एजेंट जयमिन अरविंद व्होरा याला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे अॅण्टॉपहील पोलीस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रय बनसोडे यांना मिळालेल्या माहितीवरून येथील कल्पक नाका परिसरातून एका त्रिकूटाकडूनही ९३ लाख ८० हजार पाचशे रुपयांच्या पाचशे आणि हजार रुपये दराच्या जुन्या नोटा जप्त केल्या.
या प्रकरणात रोहीत पाठक, प्रवीण कांबळे, आल्वीन बोर्डे या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. (प्रतिनिधी)
खालापुरातही जुन्या नोटा पकडल्या
चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपयांच्या सुमारे साडेसात लाख रुपयांच्या पंधराशे नोटांसह अनंता पाटील (रा. रानडे तोंडली) याला खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खालापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांना मंगळवारी संध्याकाळी एक व्यक्ती लाल रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून जुन्या नोटा घेऊन पेण-खोपोली मार्गावर डोणवत बसथांब्याजवळ उभी असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.
पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांनी तातडीने महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस नाईक पडळकर, पवार, खंडागळे, गायकवाड व पोलीस शिपाई खरे यांचे पथक डोणवतकडे रवाना केले.
पोलीस पथक डोणवत बसथांबा येथे पोहोचल्यानंतर मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार लाल रंगाची प्लॅस्टिकची पिशवी घेऊन उभी असलेली व्यक्ती आढळून आली. महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे यांनी अनंता पाटील या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.