साडेचार कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत
By Admin | Published: March 7, 2017 02:00 AM2017-03-07T02:00:18+5:302017-03-07T02:00:18+5:30
एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागासह विविध पथकांनी गेल्या एक आठवडाभरात चार कोटी ५७ लाख ८६ हजारांच्या चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. साधारण पाच ते ५० टक्के कमिशन देण्याची बतावणी करून नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवणारी टोळीच कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्तकनगरच्या उपवन भागातील राजेश गार्डन हॉटेलजवळ एका कारमधून पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी एक टोळके येणार असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांना मिळाली होती. तिच्या आधारे ४ फेब्रुवारी रोजी जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या संदीप छडवा (३५, रा. चरई, ठाणे), किरीट पांचाळ (३८, रा. कासारवडवली, ठाणे) यांना गावित यांच्यासह पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्या कारमधील प्लास्टिकच्या पिशवीतून एक हजारांच्या सहा हजार ४००, तर पाचशेच्या १४ हजार २७० अशा एक कोटी ३५ लाख ९६ हजारांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा हस्तगत केल्या आहेत. कल्याण येथील संजय म्हसकर (३७) हा त्यांना जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देणार होता. अनिल कदम (रा. डोंबिवली) हा कारचालक आणि त्याचा मित्र मनोज चव्हाण (३२, रा. चिपळूण) अशा पाच जणांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. म्हसकर हा कमिशन घेऊन हे पैसे बदलून देणार होता. आयकर विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>नोटा बनावट नसल्याने तसेच वाढीव रकमेबाबत केवळ आयकर विभागाला माहिती देण्याची तजवीज असून गुन्हा दाखल करण्याची तरतूद नसल्याने पोलिसांनी आतापर्यंत याबाबत गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>आतापर्यंतची पाचवी कारवाई
वर्तकनगर पोलिसांची ठाणे आयुक्तालयातील ही पाचवी कारवाई असून आतापर्यंत चार कोटी ५७ लाख ८६ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत जांभळीनाका भागातून २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास दयाशंकर यादव, पंकज गोयल आणि सुनिक मयतुराज या तिघांकडून एक हजाराच्या २४५०, तर पाचशे रुपये दराच्या ४३०० अशी ४६ लाखांची रोकड जप्त केली आहे.
दुसऱ्या घटनेत २७ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील गोल्डन डाइजनाक्याजवळ एक हजार आणि पाचशेच्या जुन्या ५० लाखांच्या नोटा चेतन रंधवा यांच्याकडून गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केल्या आहेत.
तिसऱ्या घटनेत २८ फेब्रुवारी रोजी टेंभीनाका भागातून एक कोटी २९ लाखांच्या नोटा किशोर डांबरे आणि विनोद शिंदे यांच्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत.
चौथ्या घटनेत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सोनसाखळी चोरीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने खारेगाव भागातूनही चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या ९६ लाख ९० हजार पाचशेच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी संजय चन्ने याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाचवी कारवाई वर्तकनगर पोलिसांनी केली असून एक कोटी ३५ लाख ९६ हजारांच्या नोटा जप्त केल्या आहेत.