आरटीओ वाहनतळातील कार जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:15 AM2020-02-18T00:15:57+5:302020-02-18T00:20:45+5:30
आगीचे कारण अस्पष्ट : सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनेची गरज
कळंबोली : पनवेल आरटीओसमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली सेलोरो कार सोमवारी दुपारी साडेबारा वाजता जळून खाक झाली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी येऊन आग विझविल्यामुळे इतर गाड्या बचावल्या. आरटीओने जमा केलेली वाहने याच पार्किंगमध्ये ठेवण्यात आली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आजच्या घटनेवरून उघड झाले आहे.
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरच पे अॅण्ड पार्कसाठी स्टील मार्केटकडून जागा देण्यात आली आहे. दररोज पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरटीओ कार्यालयात आपल्या वाहनांची कामे करण्यासाठी येतात. लोह पोलाद बाजार समितीच्या कळंबोली येथील सुविधा केंद्रात भाडेतत्त्वावर परिवहन कार्यालयाचे कामकाज चालते. कार्यालयासमोरील मोकळ्या भूखंडावर आरटीओकडून जमा केलेली वाहने उभी केली जात आहेत. कार्यालयासमोर वाहनांची गर्दी होत असल्याने लोह पोलाद समितीकडून पे अॅण्ड पार्कसाठी तोच भूखंड देण्यात आला.
सोमवारी साडेबाराच्या सुमारास गॅस फिटिंग असलेली सेलेरो एम एच ४६ बी के ७०९४ या गाडीला आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीचे प्रमाण मोठे असल्याने बाजूची स्कॉर्पिओ गाडीसुद्धा अर्धवट जळाली आहे. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आरटीओ परिसरात सुरक्षिततेचा अभाव
च्पनवेल परिवहन कार्यालय कळंबोली स्टील मार्केट येथे आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रेलचेल असते. तसेच अंतर्गत रस्त्यावर दुतर्फा पार्किंग केली जाते. त्यात कार्यालयासमोरील पार्किंगमध्ये जमा केलेली वाहने आहेत. ती अनेक कारणांमुळे एकाच जागेवर गंज खात पडून आहेत.
च्अशात त्याच जागेवर पे अॅण्ड पार्कसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे दुर्घटनेला आमंत्रण देण्याजोगे आहे. याकडे लोह पोलाद समिती तसेच आरटीओ लक्ष देईल का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.