कार विकण्यासाठी आला अन पाच लाख घेऊन पळाला
By admin | Published: September 20, 2016 10:08 AM2016-09-20T10:08:03+5:302016-09-20T10:08:03+5:30
कार विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीने लकडगंजमधील दीपक केशवराव भुजाडे (वय ५४) यांची पाच लाखांची रोकड चोरून नेली
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० - कार विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीने लकडगंजमधील दीपक केशवराव भुजाडे (वय ५४) यांची पाच लाखांची रोकड चोरून नेली. तर, सदरमधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयाची ग्रील तोडून चोरट्यांनी एक लाख रुपये चोरून नेले.
भुजाडे यांचे गरोबा मैदान परिसरात नागोबा गल्लीत निवास आणि कार्यालय आहे. देविकानंद (वय ४०, रा. यवतमाळ) असे स्वत:चे नाव सांगणारा आरोपी भुजाडेंच्या ओळखीचा आहे. डिसेंबर २०१५ मध्ये देविकानंद याने त्याची एमएच २९/ एआर १३३७ इको स्पोर्ट कार अर्जंट विकायची आहे, असे सांगून ती विकत घेण्याची भुजाडेंना गळ घातली. १४ डिसेंबरला तो कार घेऊन भुजाडेंच्या कार्यालयात आला. ७ लाख ५१ हजारांमध्ये कारचा सौदा झाल्यानंतर पाच लाख आधी आणि उर्वरित रक्कम काही दिवसानंतर देण्याचे ठरले. त्यानुसार, भुजाडे यांचा भाचा स्टॅम्पपेपर घेण्यासाठी कोर्टाकडे निघाला. भुजाडे यांनी पाच लाखांची रोकड आपल्या आॅफिसच्या टेबलावर ठेवून ते लघुशंकेकरिता गेले. परत आले तेव्हा देविकानंद ती रक्कम घेऊन निघून गेला होता. त्याला फोन लावल्यानंतर त्याने रक्कम नेल्याचे आणि आठ-दहा दिवसात परत येतो, असे सांगितले. तेव्हापासून तो सारखी टाळाटाळ करीत असल्यामुळे भुजाडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. आरोपीला हे कळताच त्याने दोन दिवसात रक्कम देतो, असे सांगितले. त्यानंतर भुजाडे यांच्या खात्यात ९८ हजार रुपये जमा केले. उर्वरित रक्कम देण्याचे तो नाव घेत नसल्याने भुजाडे यांनी सोमवारी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एस. यू. राठोड यांनी आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंक रोडवर असलेल्या स्टार हायटेक प्रा. लि. च्या कार्यालयाची ग्रील तोडून चोरट्यांनी आतमधील एक लाखाची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. श्रीकांत दिनकरराव पडोळे (वय ५६, रा. दत्तात्रय नगर) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे