आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:20 PM2018-10-20T12:20:02+5:302018-10-20T12:35:40+5:30
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत राजेंद्र सोसटे (भोसरी, पुणे) हा शनिवारी सकाळी कारने (एमएच १४ एफजी ००७७) पोलादपूरहून महाबळेश्वरकडे निघाला होता. पोलादपूर हद्दीत आंबेनळी घाटातील बावली टोकाजवळ त्याचा कारवरून ताबा सुटला. यानंतर कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. अपघातवेळी प्रशांत सोसटे कारमधून बाहेर फेकला गेला व दरीतील एका झाडावर अडकून पडला.
पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाच्या ही घटना निदर्शनास येताच त्याने तातडीने प्रतापगड व वाडा कुंभरोशी येथील नागरिकांना अपघाताची माहिती दिली. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चालक प्रशांत सोसटे याला दरीतील झाडावरून बाहेर काढले.
वाडा कुंभरोशी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.