पुलाला कार धडकल्याने चौघे ठार
By admin | Published: August 4, 2016 04:22 AM2016-08-04T04:22:32+5:302016-08-04T04:22:32+5:30
भरधाव वेगातील मोटार पुलाच्या खांबाला धडकून पुण्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
लोणावळा (जि. पुणे) : भरधाव वेगातील मोटार पुलाच्या खांबाला धडकून पुण्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मळवली गावाजवळील देवले पुलाजवळ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता झाला.
ओंकार प्रवीण मंचरकर (वय २३, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे), राजवीरसिंग योगेंद्रसिंग ठाकूर (वय २७, रा. पाषाण, पुणे), अजिंक्य कारखानीस (वय २४) व कुणाल संजय निगुडकर (वय २४, दोघेही रा. सांगवी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
चालक इम्रान युनूस शेख (रा. कोंढवा, पुणे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त मोटार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. देवले पुलाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटार पुलाच्या खांबाला धडकून अपघात झाला. मोटारीचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले. (वार्ताहर)
>पंधरा दिवसांत
३ अपघातांत १३ ठार
द्रुतगती महामार्गावर गेल्या पंधरा दिवसांत कामशेत ते मळवलीदरम्यान तीन अपघात होऊन १३ जण मृत्युमुखी पडले. वाढते अपघात ही चिंतेची बाब बनली आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.