होम प्लॅटफार्मवरून सुटणार नाही गाडी
By admin | Published: June 8, 2014 12:52 AM2014-06-08T00:52:24+5:302014-06-08T00:52:24+5:30
पावसाळ्यात शेड नसल्यामुळे होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांना पाण्यात भिजावे लागेल ही बाब प्रसार माध्यमांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धावपळ करून दुरांतो
शेड नसल्याने पंचाईत : दुरांतो प्लॅटफार्म क्रमांक सहावरून सोडण्याचा निर्णय
नागपूर : पावसाळ्यात शेड नसल्यामुळे होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांना पाण्यात भिजावे लागेल ही बाब प्रसार माध्यमांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धावपळ करून दुरांतो एक्स्प्रेस १५ जून ते ३0 सप्टेबर २0१४ दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक सहावरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात प्रवाशांची होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेने होम प्लॅटफार्मची उपाययोजना केली. परंतु सहा महिने होऊनही नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस वगळता इतर कुठल्याच रेल्वेगाड्या होम प्लॅटफार्मवरून सोडण्यात येत नसल्यामुळे होम प्लॅटफार्मचा उद्देशच बारगळला होता. होम प्लॅटफार्मवर शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. घाईगडबडीत तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी निर्णय घेऊन होम प्लॅटफार्मवरून दुरांतो एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. ९ कोटी रुपये खर्च करून केवळ एकच गाडी सोडण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. होम प्लॅटफार्म तयार करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा कुठलाच उद्देश सफल झाल्याचे दिसत नव्हते. होम प्लॅटफार्मवर शेड नसल्यामुळे पावसाळ्यात दुरांतो एक्स्प्रेसही तेथून कशी सुटणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
प्रसारमाध्यमांनी ही बाब ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धावपळ करून दुरांतोचाही प्लॅटफार्म बदलविण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या स्थितीत एकही गाडी होम प्लॅटफार्मवरून सुटत नसल्यामुळे रेल्वेचे ९ कोटी रुपये पाण्यात गेल्याची स्थिती असून रेल्वे प्रशासनाने एवढा खर्च केलाच कशाला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)