चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविणाºयाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:42 AM2017-07-31T03:42:41+5:302017-07-31T03:42:46+5:30
चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरविणाºया बाबू खेमचंद चौहान (५५) या इसमाला अटक करण्यात आली.
मुंबई : चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरविणाºया बाबू खेमचंद चौहान (५५) या इसमाला अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने बाबू चौहानला अटक केली. बाबू चौहानने अफवेच्या फोनची कबुली दिली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मूळचा अहमदाबादचा असणारा बाबू चौहान सध्या माहिम येथील खांडेपारकर हॉस्पिटलसमोरील पदपथावर वास्तव्यास होता. बिगारी आणि कॅटरिंग काम बाबू करत असे. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने बाबूकडे चर्चगेट स्थानकाच्या फोनबाबत विचारणा केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
‘श्रीनगर येथील बॉम्बस्फोटासारखा बॉम्बस्फोट चर्चगेट स्थानकांत होणार आहे,’ असा निनावी फोन रेल्वे सुरक्षा बलाच्या १८२ या क्रमांकावर आला होता. १३ जुलैला सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी हा फोन आल्यानंतर, चर्चगेट स्थानकात हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला. त्याच बरोबर स्थानकात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, दहशतवादविरोधी पथकासह डॉग स्क्वॉडदेखील दाखल झाले. चर्चगेट स्थानकासह स्थानकांतील सर्व रेल्वे बोगींची तपासणी सुरू झाली. तपासाअंती ही केवळ अफवा असल्याने, सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.